बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
बळीराजा, अन्नदाता, जगाचा पोशींदा अशा अनेक उपाध्या शेतकऱ्याला दिल्या जातात परंतु हाच शेतकरी आज संकटात सापडला आहे. आधी कोरोना, नंतर अतिवृष्टी आणि त्यातच भर म्हणून सोयाबीनचे दरही कोसळले, कापसाचे उत्पादन घटले. यामुळे शेतकरी प्रचंड अडचणीत आहे. अशा वेळी शहरवासीयांनी देखील बळीराजाला बळ देत त्यांच्या लढ्याला साथ द्यावी, असे भावनिक आवाहन शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी केले आहे.
सोयाबीन- कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी 'पक्षाचे झेंडे बाजूला ठेवू, शेतकरी म्हणून एकत्र येवू' असा नारा देत रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात ३१ ऑक्टोबर रोजी एल्गार मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांना सातत्याने अस्मानी आणि सुलतानी संकटांचा सामना करावा लागत आहे. एकापाठोपाठ एक संकटांची मालिका सुरुच असल्याने शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे. आधी कोरोना आणि त्यानंतर अतिवृष्टीने शेतकऱ्यांना हतबल केले. त्यात दुष्काळात तेरावा महिना म्हणून सोयाबीनचे दरही आता कोसळले आहेत. तब्बल ११ हजार रुपयांवरुन हे सात हजारांवर आले आणि जेव्हा अतिवृष्टीतून कशीबशी वाचलेली थोडीफार सोयाबीन व कापूस शेतकऱ्यांच्या घरात आला सोयाबीनचे दर अकरा हजारांवरून चार हजारांपर्यंत आले आहे. दुसरीकडे पेट्रोल, डिझेल, गॅस, खाद्य तेल व इतर महागाई वाढत असल्याने संसाराचा गाडा चालवावा तरी कसा? असा प्रश्न सर्वसामान्य शेतकऱ्यांसमोर आहे. या संकटांमुळे शेतकरी पुरता खचला आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत, शेतकऱ्यांची मुलं, मुली देखील आता आत्महत्या करु लागले आहेत. या कठीण प्रसंगी सर्वांनी शेतकऱ्यांना आधार देण्याची नितांत गरज आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी ३१ ऑक्टोबर रोजी ‘एल्गार मोर्चा’चे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील वकील, डॉक्टर, साहित्यिक, विचारवंत व्यावसायीक, उद्योजक आणि शहरवासीयांनी शेतकऱ्यांप्रती सहानुभूती दाखवून त्यांना आधार आणि प्रत्यक्ष कृतिशील पाठिंबा दर्शवत बळीराजाला साथ द्यावी, असे भावनिक आवाहन रविकांत तुपकर यांनी केले आहे.
रविवारी एल्गार मोर्चा : शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात रविवार, ३१ ऑक्टोबर रोजी सोयाबीन - कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एल्गार मोर्चा काढला जाणार आहे. दुपारी १२ वाजता मोठी देवी मंदिरापासून या मोर्चाला सुरुवात होणार आहे. रविवार सुटीचा दिवस असला तरी शेतकऱ्यांच्या मागण्यांचे निवेदन घेण्यासह त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी प्रशासकीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत, त्यामुळे बळीराजाच्या न्याय, हक्कासाठी जिल्ह्यातील शेतकरी, शेतमजूर, महिला, पुरुष व युवकांनी या एल्गार मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन रविकांत तुपकर यांनी केले आहे.
