बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
दिशा बुलडाणा जिल्हा महिला बचतगट फेडरेशनच्यावतीने दिवाळी फराळ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. स्थानिक एडेड चौकातील दिशा अर्बन सभागृहात २९, ३० व ३१ ऑक्टोबर असे तीन दिवस हा महोत्सव चालणार आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते यांच्या हस्ते २९ ऑक्टोबर रोजी या महोत्सवाचे उदघाटन होणार आहे.
दिवाळी म्हटलं की फराळ आलेच. फराळातील वेगवेगळे पदार्थ दिवाळी सणाची गोडी आणखीच वाढवतात. खवय्यांची आवड लक्षात घेऊन दिशा महिला बचतगट फेडरेशनच्या संस्थापक अध्यक्ष जयश्रीताई शेळके यांच्या संकल्पनेतून फराळ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सहभागी बचतगटांनी बनवलेले सर्व प्रकारचे फराळ, पणत्या, लायटिंग, पूजेचे साहित्य, तोरण, पुजाथाली, उटणे, साड्या, कपडे यासह आणखी बरेच साहित्य याठिकाणी उपलब्ध असणार आहे. २९ ऑक्टोबर रोजी जि. प. सीईओ भाग्यश्री विसपुते यांच्या हस्ते या महोत्सवाचे उदघाटन होत आहे. यावेळी जिल्हा परिषेदेच्या महिला व बालकल्याण सभापती ज्योतीताई पडघान, पंचायत समिती सभापती उषाताई चाटे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तीन दिवस चालणाऱ्या या फराळ महोत्सवाचा बुलडाणेकरांनी आस्वाद घ्यावा, असे आवाहन जयश्रीताई शेळके यांनी केले आहे
