दिशा बचतगट फेडरेशनच्या दिवाळी फराळ महोत्सवास प्रारंभ

दिशा बचतगट फेडरेशनच्या दिवाळी फराळ महोत्सवास प्रारंभ
बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
    दिशा बुलडाणा जिल्हा महिला बचतगट फेडरेशनच्यावतीने आयोजित तीन दिवसीय दिवाळी फराळ महोत्सवाचे २९ ऑक्टोबर रोजी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते यांच्या हस्ते उदघाटन झाले. बचतगटाच्या महिलांनी बनवलेल्या विविध वस्तू बघून त्यांनी समाधान व्यक्त केले.
     महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या उद्देशाने संस्थापक अध्यक्ष जयश्रीताई शेळके यांनी दिशा बुलडाणा जिल्हा महिला बचतगट फेडरेशनची स्थापना केली. आजरोजी जिल्ह्यातील जवळपास हजारावर बचतगट फेडरेशनसोबत जोडलेले आहेत. यामाध्यमातून एक आर्थिक चळवळ जिल्ह्याभरात काम करत आहे. बचतगटातील महिलांमध्ये प्रचंड गुणवत्ता आहे. मशीनला मागे टाकतील अशा वस्तू त्या हाताने बनवतात. मात्र त्यांना योग्य प्लॅटफॉर्म उपलब्ध होत नाही. नेमकी हीच बाब विचारात घेऊन दिशा बचतगट फेडरेशनच्यावतीने दरवर्षी बचतगट प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येते. गेल्यावर्षी कोरोनामुळे यामध्ये खंड पडला होता. दिवाळीतील फराळाचे महत्व व नागरिकांची मागणी लक्षात घेऊन यंदा तीन दिवसीय दिवाळी फराळ महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. सर्व प्रकारचे फराळ, पणत्या, लायटिंग, पूजेचे साहित्य, तोरण, पुजाथाली, उटणे, साड्या, कपडे यासह दैनंदीन वापरातील साहित्य स्टॉलवर उपलब्ध आहेत. दिवसभरात बुलडाणेकरांनी हजेरी लावत फराळ व इतर साहित्याची खरेदी केली.
      दिशा अर्बनच्या सभागृहात आयोजित या महोत्सवाला पंचायत समिती सभापती उषाताई चाटे, काँग्रेसच्या जळगाव जामोद विधानसभा पक्षनेत्या स्वातीताई वाकेकर, प्राथमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांच्यासह मान्यवरांनी भेटी दिल्या.