बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
तालुक्यातील मोठी समजल्या जाणाऱ्या देऊळघाट ग्रामपंचायत मधील सरपंच आणि सचिव हे इतर सदस्यांना विश्वासात न घेता मनमानी पद्धतीने कारभार चालवीत असल्याने त्यांच्या अनेक तक्रारी बुलडाणा गटविकास अधिकारी यांच्याकडे केल्या आहेत. मात्र त्यासंदर्भात कुठलीच दखल घेतली नसल्याने उपसरपंचासह इतर 8 सदस्यांनी आज 7 ऑक्टोंबर पासून गटविकास अधिकारी यांच्या दालनात ठिय्या आंदोलन सुरु केले. जोपर्यंत त्यांची दखल घेतली जात नाही तोपर्यंत हे आंदोलन मागे घेतले जाणार नसल्याची भूमिका या आंदोलनकर्त्यांनी घेतली आहे.
बुलडाणा येथून जवळच असलेल्या देऊळघाट येथे गटविकास अधिकारी यांच्या दालनात उपसरपंचासह इतर 8 सदस्यांनी ठिय्या आंदोलन सुरु केले. निवेदनात त्यांनी सांगितले की, येथील सचिव आणि सरपंच यांना
पाठीशी घालण्याचे काम वरिष्ठ अधिकारी करत असल्याचा आरोप करून सरपंच आणि सचिव यांनी बहुमत नसताना मनमानी पद्धतीने घेतलेले सर्व ठराव रद्द करण्यात यावे, संबंधित सचिव हे इतर ग्रामपंचायत सदस्यांच्या अधिकारावर गदा आणत असून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी या आंदोलनाच्या
निमित्ताने करण्यात आली आहे. या आंदोलनात उपसरपंच आरिफ खान, ग्रा.प.सदस्य मुश्ताक अहेमद, दिलीप खराडे, विकास देशमुख, माजी सरपंच गजनफर उल्लाखान, गुलाम रसुलखान, तंटामुक्ती अध्यक्ष जुनेद खान, शेख बशीर कुरेशी, भगवान हिवाळे, साहेबराव खंडारे, अशोक हिवाळे यांच्यासह ग्रामस्थ सहभागी होते.
