बुलडाणा : बँगलोर कंपनीने येथील एक गुंतवणूकदार व त्यांच्या परिवाराकडून तब्बल 11 लाख 50 हजार रुपयांची गुंतवणूक करून घेत मूळ परतावा न दिल्याच्या तक्रारीवरून 27 ऑक्टोबर रोजी शहर पोलीस स्टेशन मध्ये कंपनी मालकाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बुलढाणा शहरातील टिपू सुलतान चौक येथील फिर्यादी मो. साजिद अब्दुल हसन देशमुख यांनी 7 मार्च 2017 ते 28 सप्टेंबर 2018 दरम्यान स्वतः व कुटुंबातील आई, वडील, भाऊ, पत्नी यांचे एन एफ टी व आरटीजीएस मार्फत 11 लाख 50 हजार रुपयांची बेंगलोर येथील रिदास इंडिया कंपनीत गुंतवणूक केली. त्यांना कंपनी मालक तथा डायरेक्टर मो. आयुब हुसेन व मो.अनिस आयमन दोघे रा. बँगलोर यांनी गुंतवणुकीच्या मोबदल्यात मोठ्या प्रमाणात नफ्याचा परतावा व मूळ रक्कम परत देण्याचे आमिष दिले होते. मात्र कंपनीकडून कोणतीच रक्कम देण्यात न आल्याची व इतरही नागरिकांची फसवणूक करण्यात आल्याची फिर्यादीने 27 ऑक्टोबर रोजी शहर पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दिली आहे. दरम्यान कंपनी मालक कथा डायरेक्टर मो. आयुब हुसेन व मो. अनिस आयमन या दोघांविरुद्ध कलम 420, 406, 409, 34 भांदवी महाराष्ट्र ठेवि वित्तीय संरक्षण अधिनियम कलम 3 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी चौकशी केली असता फिर्यादी व फिर्यादीच्या कुटुंबातील सदस्यांना आमिष देऊन 11 लाख 50 हजार रुपयांनी गंडविल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी पुढील तपास ठाणेदार प्रदीप साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि नंदकिशोर काळे हे करीत आहे.