मजुर कुटुंबातील तिघांची पोलिस दलात निवड * लोणार येथील विदर्भ सैन्य व पोलिस भरती पूर्व प्रशिक्षण अकॅडमीचे विद्यार्थी

मजुर कुटुंबातील तिघांची पोलिस दलात निवड  
* लोणार येथील विदर्भ सैन्य व पोलिस भरती पूर्व प्रशिक्षण अकॅडमीचे विद्यार्थी 
 मेहकर : (एशिया मंच न्यूज )
           मेहनतीच्या जोरावर लोणी येथील मजुर कुटूंबातील तिघांची पोलिस दलात निवड झाली आहे. घरची परिस्थिती कशीही असली तरी त्यावर मात करता येते, याचे आदर्श उदाहरण या त्रिकुटाने समाजासमोर ठेवले आहे. तिघेही लोणार येथील विदर्भ सैन्य व पोलिस भरती पूर्व प्रशिक्षण अकॅडमीचे विद्यार्थी आहेत. 
लोणी येथील शेख साहिल शेख शकील, वाजीत आयुबखा पठाण, व तौफिक अफसर खा पठाण यांची महाराष्ट्र पोलीस दलात निवड झाली आहे. त्यांना लोणार येथील विदर्भ पोलीस अकॅडमीचे शेख सरांनी मार्गदर्शन केले. त्यांनी मार्च 2026 मध्ये परीक्षा दिली होती. एप्रिल महिन्यात निकाल लागला. शेख साहिल ठाणे जिल्हा पोलीस, वाजीत पठाण नागपूर शहर पोलीस तर तौफिक पठाणची मुंबई कारागृह पोलीस दलात निवड झाली. शेख साहिल लहान असतांनाच वडीलांचे निधन झाले होते. त्याच्या आईने मजूरी करून साहिलला लहानाचे मोठे केले. दहावीपर्यंत शिकविले मात्र, गरीब परिस्थितीमुळे पुढे शिक्षण थांबले. ही माहिती स्थानिक पत्रकार महम्मद खा पठाण यांना मिळाली. त्यांनी साहिलला लोणारला आणले. विदर्भ पोलिस अकॅडमीचे संचालक शेख सर यांची भेट घेऊन त्यांना साहिलच्या घरची परिस्थितीची माहिती दिली. साहिलला दत्तक घेण्याबाबत विनंती केली. शेख सरांनी सुद्धा साहिलबाबत चौकशी करून सहानुभूती दाखवत त्याला आपल्या अकॅडमीमध्ये निःशुल्क प्रवेश दिला. नोकरी लागेपर्यंत सर्व खर्च उचलण्याचे वचन दिले. साहिलची निवड झाल्यावर शेख सरांनी साहिलच्या गावात डीजे लावून मिवरणूक काढली. सर्व समाजाच्या महिलांनी ओवाळून हार व शाल देऊन स्वागत केले. गावकऱ्यांनी शेख सरांचे आभार मानून त्यांचे स्वागत केले. वाजीत पठाण आणि तौफिक पठाण यांच्या आई-वडिलांनीही मजुरी करून त्यांना शिकविले. अखेर त्यांनी जिद्द, चिकाटी, मेहनतीने यश प्राप्त केले. गावकऱ्यांनी त्यांचेही स्वागत केले.