दिवाळीच्या सुरेल संध्याकाळी ‘सांज दिवाळी’ संगीत मैफल; ५ नोव्हेंबरला बुलडाण्यात रंगणार सुरांची बरसात!
* मन्मथ म्युझिक अकॅडमी व सप्तसूर अकॅडमीचा संयुक्त उपक्रम; बालकलाकारांच्या भक्तिगीतांनी सजणार संगीत सोहळा
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज)
दिवाळीच्या आनंदोत्सवात सुरांची रंगत भरत संगीतप्रेमींना सुरेल मेजवानी देण्यासाठी बुलडाण्यात ‘सांज दिवाळी’ या विशेष संगीत मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे. मन्मथ म्युझिक अकॅडमी आणि सप्तसूर अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार, ५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता टिळक क्रीडा नाट्य मंदिर येथे हा संगीत सोहळा रंगणार आहे.
या मैफलीत बालकलाकार आपल्या सुमधुर आवाजातून विविध भक्तिगीते आणि प्रार्थना सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध करणार आहेत. सप्तसूर संगीत क्लासची विद्यार्थिनी वेदश्री मदने ‘हि तुझ्याविना वैकुंठाचे कारभार चालेना’ हे भक्तिगीत सादर करणार आहे. तसेच वेदांत मदने, विधी बारोटे, अमायरा रंगारी, संस्कृती मुळे आणि विवान डुकरे हे बालकलाकार आपल्या कलागुणांची सुरेल झलक सादर करणार आहेत.
या संगीत मैफलीला ओम चिंचोलकर (तबलावादन), केदार चुकेवार (ढोलकीवादन) आणि चुकेवार सर (संवादिनी) यांची सुरेल साथ लाभणार आहे.
दिवाळीच्या उत्सवी वातावरणात बालकलाकारांच्या कलाविष्काराला व्यासपीठ मिळावे, त्यांच्या संगीतकौशल्याला प्रोत्साहन मिळावे आणि रसिकांना दर्जेदार संगीताचा आनंद घेता यावा, हा या उपक्रमामागील उद्देश आहे.
संगीत, भक्ती आणि आनंद यांचा सुरेख संगम अनुभवण्याची संधी बुलडाणेकरांना मिळणार असून, शहरातील संगीतप्रेमी नागरिकांनी या मैफलीला मोठ्या संख्येने उपस्थित राहून बालकलाकारांचे कौतुक व प्रोत्साहन करावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
