* सामाजिक संस्थांना रक्तदानाचे आवाहन
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
सरकारी रक्तपेढीत रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्याची माहिती समोर आल्यानंतर गरजू रुग्णांची चिंता वाढली आहे. रुग्णालयांमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे, यासाठी सामाजिक संस्था, युवक आणि रक्तदात्यांनी पुढे येऊन स्वेच्छेने रक्तदान करण्याचे आवाहन अल मदीना फाउंडेशनचे अध्यक्ष नदीम शेख यांनी केले आहे.
अपघातग्रस्त, गंभीर आजारांशी झुंज देणारे रुग्ण, प्रसूतीसाठी दाखल झालेल्या महिला तसेच विविध उपचारांदरम्यान अनेक रुग्णांना सातत्याने रक्ताची आवश्यकता भासत असते. अशा परिस्थितीत रक्तपेढीत पुरेसा रक्तसाठा उपलब्ध असणे अत्यंत आवश्यक आहे.
सामाजिक संस्थांनी रक्तदान शिबिरांचे आयोजन करून अधिकाधिक नागरिकांना रक्तदानासाठी प्रेरित करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. युवक आणि नियमित रक्तदात्यांनीही मानवतेच्या या पवित्र कार्यात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
“तुमच्या रक्ताचा एक युनिट एखाद्या गरजू रुग्णाला नवजीवन देऊ शकतो.” त्यामुळे सर्व नागरिकांनी पुढे येऊन स्वेच्छेने रक्तदान करावे आणि गरजू रुग्णांना मदतीचा हात द्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
थॅलेसेमिया रुग्णांसाठी रक्तदान अत्यंत महत्त्वाचे!
थॅलेसेमिया या आजाराने ग्रस्त असलेल्या अनेक रुग्णांना नियमितपणे दर महिन्याला रक्त चढवावे लागते. रक्ताची कमतरता निर्माण झाल्यास या रुग्णांच्या उपचारात अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे रक्तपेढीत पुरेसा रक्तसाठा उपलब्ध असणे अत्यंत आवश्यक आहे.
नियमित रक्तदात्यांनी आणि सामाजिक संस्थांनी पुढे येऊन रक्तदान करावे, जेणेकरून थॅलेसेमियासह रक्ताची गरज असलेल्या प्रत्येक रुग्णाला वेळेवर रक्त उपलब्ध होऊ शकेल.
