संविधान व लोकशाही वाचवा ; SIR प्रक्रिया तात्काळ थांबवा
* मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात महाविकास आघाडीचे बुलढाण्यात तीव्र निदर्शने
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
भारतीय निवडणूक आयोगाच्या SIR प्रक्रियेच्या विरोधात तसेच मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप नोंदवत महाविकास आघाडीच्या बुलढाणा जिल्हा शाखेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करण्यात आली. यावेळी “संविधान वाचवा, लोकशाही वाचवा”, तसेच मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
या आंदोलनानंतर महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी महामहीम राष्ट्रपती यांच्या नावे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन सादर केले. भारतीय संविधानाने देशातील सर्व प्रौढ नागरिकांना मतदानाचा मूलभूत अधिकार दिला आहे. मात्र, भारतीय लोकशाहीचा आत्मा असलेल्या निवडणूक प्रक्रियेवर सध्या गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला.
महाराष्ट्रासह देशातील विविध राज्यांमध्ये सुरू असलेल्या SIR (Special Intensive Revision) प्रक्रियेच्या नावाखाली मतदार याद्यांमधून लाखो मतदारांची नावे बेकायदेशीरपणे वगळली जात असल्याचा आरोप महाविकास आघाडीने केला. ही प्रक्रिया संशयास्पद असून त्यामध्ये गरीब, दलित, अल्पसंख्याक तसेच विरोधी विचारांच्या मतदारांची नावे जाणीवपूर्वक वगळली जात असल्याचा दावा करण्यात आला. हा प्रकार भारतीय संविधानाच्या कलम 326 च्या भावनेच्या विरोधात असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
* निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर आक्षेप :
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या नेतृत्वाखालील निवडणूक आयोगाची भूमिका पक्षपाती असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. निवडणूक आयोगाची स्वायत्तता धोक्यात आली असून सत्ताधारी भाजपला अनुकूल भूमिका घेतली जात असल्याचा आरोपही महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी केला.
SIR प्रक्रियेत BLO वर दबाव, कागदपत्रांची मनमानी मागणी तसेच पूर्वसूचना न देता मतदारांची नावे वगळण्यासारख्या बाबी समोर येत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले. “लोकशाहीमध्ये निवडणूक आयोग हा पंच असतो; मात्र तोच एका पक्षाचा खेळाडू बनला तर निवडणुका स्वतंत्र आणि निष्पक्ष कशा होतील?” असा सवालही करण्यात आला.
* महाविकास आघाडीच्या प्रमुख मागण्या :
यावेळी काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष नरेश शेळके, प्रसेनजित पाटील, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शिवसेना राज्य प्रवक्त्या जयश्रीताई शेळके, जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत, गजानन वाघ, संगीतराव भोंगळ, बी.टी. जाधव, पी.एम. जाधव, लक्ष्मणराव भुमरे, दत्ता पाटील, दीपक रिंढे, सुनील सोनवणे, बाळासाहेब पवार, वर्षाताई इंगळे, नाझीमाताई खान यांच्यासह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना (उबाठा) पक्षाचे जिल्ह्यातील मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
