अंत्री खेडेकर शिवारात अज्ञात वन्यप्राण्याचा ५० वर्षीय इसमावर हल्ला
* पाठीवर हल्ला होताच विहिरीत पडला; पोहता येत असल्याने वाचला जीव, वन्यप्राण्याचा बंदोबस्त करण्याची ग्रामस्थांची मागणी
-----------------------
चिखली : (एशिया मंच न्यूज )
अंत्री खेडेकर शिवारात शेतात काम करत असलेल्या ५० वर्षीय इसमावर अज्ञात वन्यप्राण्याने पाठीमागून अचानक हल्ला केल्याची घटना घडली. या हल्ल्यामुळे इसमाचा तोल जाऊन तो विहिरीत पडला. पोहता येत असल्याने त्याने प्रसंगावधान राखत आपला जीव वाचवला. या घटनेमुळे परिसरातील शेतकरी व शेतमजुरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
अंत्री खेडेकर येथील पंजाब दगडू मोरे (५०) हे संदीप शिवशंकर खेडेकर यांच्या शेतात कामावर आहेत. नेहमीप्रमाणे ते शेतात काम करण्यासाठी गेले होते. काल दुपारी सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास ते पाणी काढण्यासाठी विहिरीजवळ गेले असता, पाठीमागून अज्ञात वन्यप्राण्याने त्यांच्यावर अचानक हल्ला केला. त्यामुळे त्यांचा तोल जाऊन ते विहिरीत पडले.
सदर वन्यप्राणी झुडपांमध्ये दबा धरून बसला असावा, असा अंदाज परिसरातील नागरिकांनी व्यक्त केला आहे. विहिरीत पडल्यानंतर पोहता येत असल्यामुळे मोरे यांनी स्वतःचा जीव वाचवला. मात्र, विहिरीतून बाहेर येण्यासाठी त्यांना सुमारे एक तास संघर्ष करावा लागला.
दरम्यान, अंत्री खेडेकर-मेरा खुर्द रस्त्यावर राजू वासुदेव खेडेकर यांचे घर असल्याने मोरे हे जखमी अवस्थेत त्यांच्या घरी पोहोचले. राजू खेडेकर यांनी त्यांना तातडीने अंत्री खेडेकर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपचार केल्यानंतर त्यांना सुट्टी देण्यात आली.
या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या सोयाबीन सोंगणीचा हंगाम सुरू असून शेतमजुरांमध्येही भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे मजुरांच्या रोजगारावर परिणाम होण्याची तसेच शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
वनविभागाने घटनेची तातडीने दखल घेऊन परिसराची पाहणी करावी, अज्ञात वन्यप्राण्याचा शोध घेऊन त्याचा बंदोबस्त करावा, अशी आग्रही मागणी ग्रामस्थ व नागरिकांकडून होत आहे.
