खरिपाच्या पिकांसाठी कोराडी, पेनटाकळीसह अन्य प्रकल्पांतून पाणी सोडणार!* पाण्याचा काटकसरीने वापर करा; रब्बी पिकांसाठी पाणी वापरल्यास कारवाईचा इशारा – केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव

खरिपाच्या पिकांसाठी कोराडी, पेनटाकळीसह अन्य प्रकल्पांतून पाणी सोडणार!
* पाण्याचा काटकसरीने वापर करा; रब्बी पिकांसाठी पाणी वापरल्यास कारवाईचा इशारा – केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव
मेहकर : (एशिया मंच न्यूज )
           मेहकर व लोणार तालुक्यांतील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता खरिपातील पिके वाचविण्यासाठी कोराडी, पेनटाकळीसह उकळी, पळशी, घाटबोरी, अकोला ठाकरे, परतापूर-उतावळी आणि खळेगाव येथील सिंचन प्रकल्पांतून अतिरिक्त पाणी सोडण्यास प्रशासनाने मान्यता दिली आहे. मात्र, उपलब्ध पाण्याचा शेतकऱ्यांनी अत्यंत काटकसरीने वापर करावा. या पाण्याचा रब्बी पिकांसाठी वापर केल्यास कारवाईला सामोरे जावे लागेल, असा स्पष्ट इशारा केंद्रीय आयुष, आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी दिला.
मेहकर येथील भूमिपुत्र प्रतापराव जाधव शेतकरी भवनात पेनटाकळी-कोराडी पाणी वापर संस्थेच्या वतीने आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी माजी आमदार संजय रायमुलकर यांची प्रमुख उपस्थिती होती. शेकडो शेतकऱ्यांच्या उपस्थितीमुळे सुरुवातीला शिवसेना कार्यालयात नियोजित असलेली बैठक शेतकरी भवनात घेण्यात आली.
तूर, हळद आणि कपाशी वाचविण्यासाठी पाण्याची मागणी
यंदा पावसाने मोठी ओढ दिल्याने शेतकऱ्यांसमोर खरीप पिके वाचविण्याचे संकट उभे राहिले आहे. सोयाबीनमधून अत्यल्प उत्पन्न मिळण्याची शक्यता असताना तूर, हळद आणि कपाशी ही पिकेही पाण्याअभावी धोक्यात आली आहेत. त्यामुळे सिंचन प्रकल्पांमधून पाणी सोडून पिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी पाणी वापर महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र गाडेकर यांनी केली.
शेतकऱ्यांची ही अडचण मांडताना माजी आमदार संजय रायमुलकर यांनीही पिके वाचविण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली.
४० टक्के कमी पाऊस; दुष्काळाचा सामना करण्याचे आवाहन
यावेळी प्रतापराव जाधव म्हणाले की, यंदा सरासरीच्या तुलनेत सुमारे ४० टक्के पाऊस कमी झाला असून, पिकांना सलग तीन महिने पावसाचा ताण सहन करावा लागला आहे. विहिरींच्या पाणीपातळीतही झपाट्याने घट होत आहे. आगामी काळात पाणीटंचाईचे संकट अधिक गंभीर होण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी उपलब्ध पाण्याचे नियोजनपूर्वक व्यवस्थापन करावे.
सिंचन प्रकल्पांतील पाण्यापैकी सुमारे ३० टक्के पाण्याचे बाष्पीभवन होण्याची शक्यता असून, पिण्याच्या पाण्यासाठी आणि राखीव साठ्यासाठीही पाणी ठेवावे लागणार आहे. या गरजा पूर्ण केल्यानंतर शिल्लक राहणारे पाणी खरीप पिकांसाठी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी आपण केली होती. त्याला मान्यता मिळाल्याचे जाधव यांनी सांगितले.
कोल्हापुरी बंधाऱ्यांतील पाणी वाया जाऊ देऊ नका
कोराडी व पेनटाकळी प्रकल्पांसह अन्य सिंचन प्रकल्पांमधून नदीपात्राद्वारे पाणी सोडले जाणार आहे. हे पाणी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविताना कोल्हापुरी बंधाऱ्यांतून वाहून जाणार नाही, याची दक्षता घ्यावी. प्रत्येक थेंबाचा योग्य वापर करून खरीप पिके वाचविण्यास प्राधान्य द्यावे, असे आवाहन केंद्रीय मंत्री जाधव यांनी केले.
पाण्याचा वापर केवळ खरीप पिकांसाठीच करावा. रब्बी पिकांसाठी या पाण्याचा वापर करू नये, अन्यथा संबंधितांवर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
जलसंधारणाची कामे हाती घेण्याची गरज
दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी सिंचन प्रकल्पांमधील गाळ काढणे, छोटे तलाव तसेच नद्या-नाल्यांचे रुंदीकरण करणे आवश्यक असल्याचे जाधव म्हणाले. पाणी वापर महासंघाची शेतकऱ्यांकडे असलेली थकबाकीही भरावी, असे आवाहन त्यांनी केले. शासनाकडून चारा बियाणे उपलब्ध करून दिले जाणार असून, शेतकऱ्यांनी त्याची पेरणी करून चारा उत्पादनावर भर द्यावा. शासन चारा खरेदी करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर उपलब्ध जलसाठ्याचे नियोजन, पाणी बचत आणि चारा उत्पादन यांना प्राधान्य देण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.
या मेळाव्याला शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख किसनराव बळी, तालुकाप्रमुख सुरेश तात्या वाळूकर, मोहन धोटे यांच्यासह विविध मान्यवर आणि शेकडो शेतकरी उपस्थित होते..