दिवाळीपूर्वी बुलढाण्यातील ३ लाख ३६ हजार शेतकऱ्यांना ६७ कोटींचा आर्थिक आधार!
* केंद्र व राज्य शासनाच्या योजनांतून पात्र शेतकऱ्यांना सात हजार रुपयांचा लाभ ; केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांची माहिती
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक आधार दिला जात आहे. पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेच्या २४ व्या हप्त्यापोटी बुलढाणा जिल्ह्यातील ३ लाख ३६ हजार ८२५ पात्र शेतकरी कुटुंबांच्या बँक खात्यांत ६७ कोटी ३६ लाख रुपयांचा निधी थेट जमा करण्यात आला आहे. केंद्र शासनाकडून दोन हजार रुपये आणि राज्य शासनाच्या माध्यमातून पाच हजार रुपयांचा अग्रीम लाभ अशा एकूण सात हजार रुपयांचा आर्थिक आधार पात्र शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मिळत असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेच्या २४ व्या हप्त्याचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठांतर्गत बुलढाणा येथील कृषी विज्ञान केंद्रात करण्यात आले. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी उपस्थित शेतकरी व कृषी क्षेत्रातील प्रतिनिधींशी संवाद साधला.
यावेळी डॉ. धनराज उंदीरवाडे (संचालक, विस्तार शिक्षण), डॉ. प्रमोद वाकळे (सहयोगी अधिष्ठाता), जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संतोष डाबरे, डॉ. सतीश जाधव (प्राचार्य, कृषी तंत्र विद्यालय), कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ अमोल झापे, ओमसिंग राजपूत, अनुजा सावळे, अॅड. गायकवाड यांच्यासह शेतकरी, महिला बचत गटांच्या प्रतिनिधी व पत्रकार उपस्थित होते.
* आधुनिक तंत्रज्ञानाचा शेतीत वापर करा
हवामान बदल आणि अल निनोच्या संभाव्य प्रभावामुळे शेतीसमोर निर्माण होणाऱ्या आव्हानांचा सामना करण्यासाठी शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करावा, असे आवाहन प्रतापराव जाधव यांनी केले. अँड्रॉइड मोबाईलच्या माध्यमातून पिकांवरील रोग व किडींचे छायाचित्र अपलोड करून तज्ज्ञांकडून निदान व मार्गदर्शन घेण्याची सुविधा शेतकऱ्यांनी वापरावी. तसेच माती परीक्षणाचे अहवाल तांत्रिक भाषेऐवजी सोप्या मराठीत उपलब्ध करून द्यावेत. नत्र, स्फुरद आणि पालाश (NPK) यांचे प्रमाण शेतकऱ्यांना सहज समजेल, अशा स्वरूपात अहवाल देण्याच्या सूचनाही त्यांनी संबंधित यंत्रणेला केल्या.
* रब्बी हंगामात चारा पिकांच्या नियोजनाला प्राधान्य
आगामी काळातील संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करणे आवश्यक आहे. पिण्याच्या पाण्याची गरज आणि पशुधनासाठी चाऱ्याची उपलब्धता लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी रब्बी हंगामाचे नियोजन करावे. हरभरा, ज्वारी आणि चारा पिकांच्या लागवडीला प्राधान्य द्यावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले. चारा उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी शासनाकडून हमीभावाने चारा खरेदी करण्याबाबतही माहिती देण्यात आली.
* महिला बचत गटांच्या माध्यमातून रोजगारनिर्मितीवर भर
विकसित भारत २०४७ चे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी महिला सक्षमीकरण आणि आर्थिक उपक्रमांमधील महिलांचा सहभाग महत्त्वाचा आहे. शेती व पूरक व्यवसायांमध्ये महिलांचा सहभाग वाढविण्यासोबतच महिला बचत गटांच्या माध्यमातून रोजगार आणि उत्पन्ननिर्मितीच्या संधी उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला. कृषी क्षेत्राच्या विकासात महिलांची भूमिका महत्त्वपूर्ण असल्याचे यावेळी प्रतिपादन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ अमोल झापे यांनी केले. विस्तार शिक्षण संचालक डॉ. धनराज उंदीरवाडे आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संतोष डाबरे यांनी कृषी क्षेत्रातील विविध शासकीय योजनांची माहिती दिली. बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर रब्बी हंगामाचे नियोजन, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर तसेच पाणी व चारा व्यवस्थापनाचे महत्त्व त्यांनी विशद केले. यावेळी विविध महिला बचत गट आणि प्रगतिशील शेतकऱ्यांचा सन्मानपत्र देऊन प्रातिनिधिक स्वरूपात गौरव करण्यात आला.
