तुपकरांच्या नेतृत्वात देऊळगाव राजात ‘भीक मांगो’ आंदोलन; ५ हजार रुपये सरकारला पाठवले!
देऊळगाव राजा : (एशिया मंच न्यूज )
राज्यातील दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना केवळ पाच हजार रुपयांची मदत देऊन सरकारने क्रूर थट्टा केल्याचा आरोप करत क्रांतिकारी शेतकरी संघटनेने शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात देऊळगाव राजा येथे ‘भीक मांगो’ आंदोलन केले. भीक मागून जमा झालेली रक्कम तहसीलदारांमार्फत शासनाकडे सुपूर्द करण्यात आली.
शेतकऱ्यांना कोणत्याही अटी व हेक्टरच्या मर्यादेशिवाय हेक्टरी एक लाख रुपये नुकसानभरपाई द्यावी, कुंभमेळ्यावरील व अनावश्यक सरकारी खर्चाला आळा घालावा आणि चारा छावण्यांऐवजी शेतकऱ्यांच्या दावणीला चारा द्यावा, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या.
* लवकरच राज्यव्यापी आंदोलन
कुंभमेळा आणि वाहन खरेदीसाठी सरकारकडे कोट्यवधी रुपये आहेत; मात्र शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी पैसे नाहीत का, असा संतप्त सवाल तुपकर यांनी केला. शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास राज्यभर आक्रमक आंदोलन उभारून सरकारला बळीराजाची ताकद दाखवून देऊ, असा इशाराही त्यांनी दिला. यावेळी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
