बँकांच्या कर्जबोज्याचे कारण देत पीककर्ज नाकारू नका!* पात्र शेतकऱ्यांना तातडीने पीककर्ज द्या; जिल्हा काँग्रेसची मागणी

बँकांच्या कर्जबोज्याचे कारण देत पीककर्ज नाकारू नका!
* पात्र शेतकऱ्यांना तातडीने पीककर्ज द्या; जिल्हा काँग्रेसची मागणी
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज)
           इतर बँकांचे कर्ज, जमिनीवरील कर्जबोजा किंवा कमी सिबिल स्कोअरचे कारण देत पात्र शेतकऱ्यांना नवीन पीककर्ज नाकारू नये, अशी मागणी बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीने केली आहे. यासंदर्भात २१ ऑक्टोबर रोजी अप्पर जिल्हाधिकारी सुधीर खांदे यांना निवेदन देण्यात आले.
       पीककर्जासाठी शेतकऱ्यांना बँकांचे उंबरठे झिजवावे लागत असून, लीड बँकेच्या निर्देशांनंतरही अडचणी कायम असल्याचा आरोप काँग्रेसने केला. पीककर्ज नाकारणाऱ्या बँकांची चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणीही करण्यात आली.

* बँकांच्या कामकाजाचा आढावा घ्या : प्रकाश पाटील
      जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली बँक अधिकारी, लीड बँक प्रतिनिधी आणि कृषी विभागाची संयुक्त बैठक घेऊन प्रलंबित अर्ज, कर्ज नाकारण्याची कारणे आणि मंजुरीतील विलंबाचा आढावा घ्यावा, अशी मागणी जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील यांनी केली. यावेळी आमदार धीरज लिंगाडे, समाधान सुपेकर, देवानंद पवार, रिजवान सौदागर यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.