* शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपयांची मदत द्या :अमोल रिंढे पाटील
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
राज्यातील १८ जिल्ह्यांचा दुष्काळसदृश्य यादीत समावेश करण्याचा निर्णय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केला असताना, या यादीतून बुलढाणा जिल्ह्याला वगळण्यात आल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली आहे. बुलढाणा जिल्ह्याचा तातडीने दुष्काळसदृश्य यादीत समावेश करावा आणि संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपयांची आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी मनसेचे तालुकाध्यक्ष अमोल रिंढे पाटील यांनी केली आहे.
यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मंगळवार 15 सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले. जिल्ह्यातील गंभीर पावसाची परिस्थिती आणि खरीप हंगामातील पिकांचे झालेले नुकसान लक्षात घेता शासनाने तातडीने ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील तब्बल ९२ महसूल मंडळांमध्ये मागील ३० ते ३५ दिवसांपासून पावसाचा मोठा खंड पडला आहे. पावसाने पाठ फिरवल्याने सोयाबीन, कपाशी, तूर यासह विविध खरीप पिकांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. पिके करपून गेल्याने उत्पादन होण्याचा प्रश्नच नाही. जिल्ह्यात यंदा तब्बल ७ लाख २१ हजार ६३ हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणी करण्यात आली आहे. मात्र पावसाच्या प्रदीर्घ खंडामुळे एवढ्या मोठ्या क्षेत्रावरील पिके धोक्यात आली आहेत. आधीच वाढलेला उत्पादन खर्च, महागडी बियाणे-खते आणि मजुरीचा बोजा शेतकऱ्यांवर असताना आता दुष्काळ पडल्याने शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे. सरकारने दुष्काळ जाहीर करून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये मदत द्यावी अशी मागणी, अमोल रिंढे पाटील, ऋषिकेश ठेंग, पवन सरोदे, शुभम पाटील, पवन पाटील, ऋतिक पाटील, शुभम मुळे, कृष्णा रिंढे, बाळू मुळे यांच्यासह शेकडो मनसे पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
* शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार : अमोल रिंढे पाटील
राज्यातील इतर जिल्ह्यांचा दुष्काळसदृश्य यादीत समावेश केला जात असताना बुलढाण्याला मात्र वगळण्यात आल्याने शासनाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळल्याची संतप्त भावना बुलढाणा मनसे तालुकाध्यक्ष अमोल रिंढे पाटील यांनी व्यक्त केली. बुलढाण्यातील शेतकरी संकटात असताना शासनाने केवळ कागदोपत्री निकष न पाहता प्रत्यक्ष शेतातील परिस्थिती लक्षात घ्यावी. जिल्ह्याचा दुष्काळसदृश्य यादीत समावेश करून शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपयांची मदत जाहीर करावी. अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना शेतकऱ्यांच्या न्यायासाठी आक्रमक आंदोलन उभारेल, असा इशारा अमोल रिंढे पाटील यांनी दिला.
* या आहेत मनसेच्या प्रमुख मागण्या :
बुलढाणा जिल्ह्याचा तातडीने दुष्काळसदृश्य यादीत समावेश करण्यात यावा, पावसाच्या प्रदीर्घ खंडामुळे नुकसान झालेल्या खरीप पिकांचे तातडीने पंचनामे करण्यात यावेत, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये आर्थिक मदत देण्यात यावी, जिल्ह्यातील ९२ महसूल मंडळांमधील पावसाची परिस्थिती व पिकांची वस्तुस्थिती लक्षात घेऊन विशेष पाहणी करण्यात यावी, शेतकऱ्यांना पीक विमा व शासनाच्या इतर मदतीचा लाभ तातडीने मिळवून देण्यात यावा, खरीप हंगामातील नुकसान लक्षात घेऊन शेतकऱ्यांना कर्ज वसुलीपासून दिलासा देण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात याव्यात ह्या आहेत.
