* देऊळगाव माळी येथे जीर्ण वीज वाहिन्यांमुळे मोठा अपघात टळला
* अधिकारी गंभीर दुर्घटनेची वाट पाहत आहेत का?
देऊळगाव माळी : (एशिया मंच न्यूज )
महावितरण कंपनीच्या सुस्त आणि बेजबाबदार कारभारामुळे निष्पाप नागरिकांचा आणि लहान मुलांचा जीव पुन्हा एकदा टांगणीला लागला आहे. देऊळगाव माळी येथील जुने ग्रामपंचायत कार्यालय ते सावतामाळी मंदिर भागातील विजेच्या जीर्ण तारा आणि केबल सतत तुटून पडत असल्याने नागरिक दहशतीखाली वावरत आहेत. ४ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास शाळेत जाणाऱ्या निष्पाप विद्यार्थ्यांना विजेचा जोरदार धक्का बसून मोठी जीवितहानी होण्याची धक्कादायक शक्यता निर्माण झाली होती. सुदैवाने, गावातील सतर्क नागरिकांनी प्रसंगावधान राखून मुलांना वेळीच बाजूला केल्यामुळे एक अत्यंत भीषण अनर्थ टळला.
मिळालेल्या माहितीनुसार ४ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास अचानक मुख्य वीज वाहिनी तुटून रस्त्यावर कोसळली. याच वेळेत रस्त्याने अनेक शाळकरी विद्यार्थी जात होते. चालू लाईनची वायर खाली पडल्याचे पाहताच स्थानिक ग्रामस्थ दिगंबर गिर्हे व पवन गाभणे यांच्या धोका तात्काळ लक्षात आला. त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता विद्यार्थ्यांना तात्काळ बाजूला होण्याचे आवाहन केले. या सतर्कतेमुळे मोठा अपघात आणि जीवितहानी टळली. घटनेचे गांभीर्य ओळखून दिगंबर गिर्हे यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना फोनवरून संबंधित घटनेची तात्काळ माहिती दिली.
गावकऱ्यांनी यापूर्वीही महावितरणच्या मेहकर कार्यालयाला अनेकदा तोंडी व लेखी सूचना देऊन या धोकादायक तारा बदलण्याची विनंती केली होती. मात्र, 'थातुरमात' कारभार करणाऱ्या प्रशासनाने या गंभीर समस्येकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केले. त्या दुर्लक्षामुळेच आज दोन मुख्य केबल थेट रस्त्यावर कोसळल्याची घटना घडली.
या भोंगळ कारभारा विरोधात समस्त गावकरी मंडळींनी एकत्र येत महावितरण उपविभागीय कार्यालय मेहकरचे उपकार्यकारी अभियंता यु. एच. कळसकर व यु. पी. घोलप यांना थेट उपरोधिक आणि आक्रमक इशारा देत निवेदन सादर केले. ग्रामस्थ दिगंबर गिर्हे, पत्रकार कैलास राऊत व सामाजिक कार्यकर्ते पवन गाभणे यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरत गावातील सर्व ठिकाणची जीर्ण वायरिंग बदलून तातडीने केबल टाकण्याची मागणी लावून धरली.
दिलेल्या निवेदनात नमूद अशी आहे की, जुने ग्रामपंचायत कार्यालय ते सावतामाळी मंदिर परिसरासह देऊळगाव माळी गावातील सर्व ठिकाणची धोकादायक वायरिंग तात्काळ बदलून एअर बंच केबल बसवण्यात यावी. यापुढे वीज वाहिनी तुटून कोणतीही दुर्घटना किंवा जीवितहानी झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी महावितरण कंपनी आणि संबंधित निष्काळजी अधिकाऱ्यांचीच असेल. या निवेदनाची प्रत मुख्य अभियंता (अकोला परिमंडळ) आणि ग्राहक तक्रार निवारण मंच (अकोला) यांच्याकडेही पाठवण्यात आली आहे.
ग्रामस्थांच्या आक्रमक पवित्र्यानंतर उपकार्यकारी अभियंता यु. एच. कळसकर यांनी सांगितले की, आम्ही तात्काळ येत्या दोन दिवसांमध्ये संबंधित ठिकाणची धोकादायक वायर बदलून त्या ठिकाणी एयर केबल टाकणार आहोत. तसेच तुमच्या गावातील ग्रामपंचायतीचा ठराव घेतल्यास, खासदार निधीतून अथवा डीपीडीसी (DPDC) च्या मीटिंगमध्ये गावातील पूर्ण वायरिंग बदलण्यासाठी निधी उपलब्ध झाल्यास संपूर्ण गावात नवीन केबल टाकणे शक्य होईल, असे स्पष्टीकरणही त्यांनी यावेळी दिले.
महावितरणच्या बेजबाबदार कारभारा विरोधात देऊळगाव माळी येथील ग्रामस्थ पूर्णपणे एकवटले आहेत. या निवेदनावर गावातील जबाबदार नागरिकांनी स्वाक्षऱ्या करून प्रशासनाविरोधात एल्गार पुकारला आहे. या निवेदनावर दिगंबर दत्तात्रय गिर्हे, दत्तात्रय ना. गिर्हे, एकनाथ गिर्हे, गणेश बाबुराव गाभणे, यशवंत दगडू मगर, सुधाकर शिवाजी मगर, शिवाजी लक्ष्मण खरात, शिवा विश्वंभर मळेकर, दत्तात्रय नामदेव मगर, ज्ञानेश्वर ज्यो. मगर, गणेश बा. गाभणे, सुधाकर शि. मगर, संदीप अंभोरे, गौतम गवई, संजीव जगदेव बळी, काशिबा रामभाऊ गवई, दत्तात्रय पुंडलिक मगर, नागेश गजानन खंडागळे, समाधान गिर्हे, सुरेश नारायण जाधव, बबन कृष्णाजी गाभणे, विशाल श्रीकृष्ण मगर, मोहन वि. मगर, जयराम श्रीरंग बकाल, स्वप्नील सुनील गाभणे, राहुल श्रीकृष्ण मगर, भागवत विष्णू मगर, जगदीश विष्णू मगर, केशव बळीराम मगर, गणेश सुखदेव बळी, नितीन रघुनाथ नाईक, रघुनाथ रामदास बळी, कैलास हरिभाऊ राऊत यांच्यासह अनेक ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
महावितरण आता दिलेल्या आश्वासनानुसार दोन दिवसांत काम सुरू करणार, की एखाद्या मोठ्या दुर्घटनेचीच वाट पाहणार, असा सवाल संतप्त ग्रामस्थांकडून विचारला जात आहे.
