दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी सकारात्मक निर्णयाबद्दल प्रतापराव जाधव यांनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार* मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांची प्रत्यक्ष भेट; आयुष, आरोग्य व कौशल्य विकासाच्या विविध विषयांवर सकारात्मक चर्चा


दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी सकारात्मक निर्णयाबद्दल प्रतापराव जाधव यांनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार
* मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांची प्रत्यक्ष भेट; आयुष, आरोग्य व कौशल्य विकासाच्या विविध विषयांवर सकारात्मक चर्चा
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
         महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने घेतलेल्या सकारात्मक निर्णयाबद्दल केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन आभार मानले. यावेळी आयुष, आरोग्य, कौशल्य विकास तसेच महाराष्ट्राच्या विकासाशी संबंधित विविध महत्त्वपूर्ण विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
       केंद्रीय आयुष, आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव हे २९ सप्टेंबर रोजी मुंबई दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.                   पावसामध्ये झालेल्या खंडामुळे राज्यातील अनेक भागांतील पिकांवर परिणाम झाला असून, शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने दुष्काळग्रस्त तालुके जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना विविध सवलती व मदतीचा लाभ मिळण्यास मदत होणार आहे.
          बुलढाणा जिल्ह्याचाही दुष्काळग्रस्त श्रेणीत समावेश करण्याच्या निर्णयाबद्दल प्रतापराव जाधव यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार व्यक्त केले.
स्वतंत्र आयुष मंत्रालय व विद्यापीठाची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या चर्चेत महाराष्ट्रात आयुर्वेद, योग, निसर्गोपचार, युनानी, सिद्ध आणि होमिओपॅथी या उपचारपद्धतींच्या सर्वांगीण विकासासाठी स्वतंत्र आयुष मंत्रालय स्थापन करण्याबाबत चर्चा करण्यात आली. तसेच राज्यातील आयुष शिक्षण, संशोधन आणि कौशल्य विकासाला चालना देण्यासाठी स्वतंत्र आयुष विद्यापीठ स्थापन करण्याची मागणीही करण्यात आली.
        मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य आढावा बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी महापालिका आयुक्तांना आवश्यक निर्देश देण्याचा विषयही यावेळी मांडण्यात आला.
       उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्यासोबत विविध प्रस्तावांवर चर्चा
यानंतर केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी शिवसेनेचे मुख्य नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांची भेट घेतली. महाराष्ट्राच्या विकासाशी संबंधित विविध महत्त्वपूर्ण विषयांवर यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली.
        यामध्ये ठाणे येथे २०० खाटांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे रुग्णालय उभारण्याचा प्रस्ताव, मौजे दरेगाव, जि. सातारा येथे केंद्रीय योग व निसर्गोपचार संशोधन संस्था उभारण्याचा प्रस्ताव तसेच राष्ट्रीय आयुष अभियानांतर्गत निसर्गोपचार महाविद्यालय व रुग्णालय स्थापन करण्याच्या प्रस्तावाचा समावेश होता.
तसेच ठाणे येथे इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयांतर्गत कौशल्य विकास केंद्र सुरू करणे आणि राष्ट्रीय सिद्ध संस्थेचे उपकेंद्र स्थापन करण्याबाबतही चर्चा करण्यात आली.
       राज्यातील ३०० कोटी वृक्ष लागवड योजनेमध्ये औषधी वनस्पतींच्या लागवडीचा समावेश करण्याची विनंतीही करण्यात आली. याशिवाय NAFEDच्या माध्यमातून राज्यात जनऔषधी केंद्रे सुरू करून ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांना गुणवत्तापूर्ण औषधे उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली.
या सर्व प्रस्तावांना गती देण्यासाठी राज्य शासनाच्या स्तरावर आवश्यक सहकार्य व पाठपुरावा करण्यासंदर्भात सकारात्मक चर्चा झाली.
      आरोग्य, आयुष, कौशल्य विकास आणि नागरिकांना अधिक चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने राज्य सरकारच्या वतीने सकारात्मक निर्णय घेतले जातील, असा विश्वास केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी व्यक्त केला.