ANM भरतीतील ३५ टक्के गुणधारकांना नियुक्तीची संधी द्या !
* क्रांतिकारीची शेतकरी संघटनेची मागणी
* बुलडाणा जिल्ह्यातील रिक्त पदे तातडीने भरून ; ३० जुलैच्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले निवेदन
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
सन २०२३ मध्ये आरोग्य विभागामार्फत घेण्यात आलेल्या ANM (आरोग्य सेविका) पदाच्या परीक्षेतील ४५ टक्के गुणांची पात्रता पूर्ण केलेल्या उमेदवारांना नियुक्त्या देण्यात आल्या आहेत. मात्र, त्यानंतरही बुलडाणा जिल्ह्यासह विविध जिल्ह्यांमध्ये ANM संवर्गातील काही पदे रिक्त असल्याने या रिक्त पदांवर ३५ ते ४५ टक्के गुण मिळविलेल्या पात्र उमेदवारांना संधी देण्यात यावी, यासंदर्भात जिल्हा परिषद, बुलडाणा येथील मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले असून ३० जुलै २०२६ रोजीच्या शासन निर्णयाची जिल्ह्यात तातडीने अंमलबजावणी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
दिलेल्या निवेदनात नमूद आहे की, सन २०२३ मध्ये ANM पदासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेचे नियोजन व परीक्षा प्रक्रिया IBPS संस्थेमार्फत करण्यात आली होती. या भरती प्रक्रियेत शासनाने निश्चित केलेल्या ४५ टक्के गुणांची पात्रता पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना नियुक्त्या देण्यात आल्या. मात्र, नियुक्त्या दिल्यानंतरही राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये ANM संवर्गातील काही पदे रिक्त राहिली आहेत. ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्य सेवा प्रभावीपणे उपलब्ध करून देण्यासाठी आरोग्य विभागातील आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध असणे गरजेचे आहे. त्यामुळे रिक्त पदांमुळे आरोग्यसेवा पुरविताना अडचणी निर्माण होण्याची शक्यता असून, उपलब्ध मनुष्यबळाचा योग्य वापर करण्यासाठी शासन निर्णयानुसार पुढील प्रक्रिया तातडीने राबविण्याची मागणी करण्यात आली आहे.
शासनाने ३० जुलै २०२६ रोजी पात्रता गुणांची अट ४५ टक्क्यांवरून ३५ टक्क्यांपर्यंत शिथिल करण्याचा निर्णय घेतल्याच्या पार्श्वभूमीवर, सन २०२३ मधील ANM परीक्षेत ३५ ते ४५ टक्के गुण प्राप्त केलेल्या सर्व उमेदवारांची अधिकृत व प्रमाणित यादी IBPS कडून मागविण्यात यावी, या यादीच्या आधारे बुलडाणा जिल्ह्यातील ANM संवर्गातील उपलब्ध रिक्त पदांची संख्या निश्चित करून, शासनाच्या आरक्षण धोरणानुसार प्रवर्गनिहाय पात्र उमेदवारांची गुणवत्ता यादी तयार करण्यात यावी. तसेच लागू असलेल्या नियमांनुसार पात्र उमेदवारांना रिक्त पदांवर नियुक्तीची संधी देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
बुलडाणा जिल्ह्यात ANM संवर्गातील सध्या किती पदे रिक्त आहेत, त्यापैकी कोणत्या प्रवर्गातील किती पदे उपलब्ध आहेत आणि त्यावर लागू असलेली आरक्षणस्थिती काय आहे, याची माहिती प्रशासनाने तातडीने निश्चित करून पारदर्शक पद्धतीने प्रसिद्ध करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. ३५ टक्के किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळविलेल्या उमेदवारांपैकी शासनाच्या निकषांनुसार पात्र ठरणाऱ्या उमेदवारांना उपलब्ध रिक्त पदांवर नियुक्तीची कार्यवाही करण्यात यावी, तसेच IBPS कडून अधिकृत यादी प्राप्त करण्यासाठी जिल्हा स्तरावर आवश्यक ती कार्यवाही तातडीने सुरू करावी. त्यानंतर गुणवत्ता व आरक्षणाच्या नियमानुसार पात्र उमेदवारांची निवड प्रक्रिया पूर्ण करून नियुक्ती प्रक्रिया निश्चित कालमर्यादेत पार पाडावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान ४५ टक्के गुणांची अट पूर्ण न झाल्यामुळे नियुक्तीपासून वंचित राहिलेल्या, मात्र आता शासनाच्या निर्णयानुसार पात्र ठरणाऱ्या उमेदवारांचे लक्ष या प्रक्रियेकडे लागले आहे. त्यामुळे बुलडाणा जिल्ह्यातील रिक्त ANM पदांची माहिती जाहीर करून ३५ टक्के गुणांच्या पात्र उमेदवारांना शासन निर्णयानुसार नियुक्तीची संधी मिळणार का, याकडे उमेदवारांचे लक्ष लागले आहे. यावेळी क्रांतीकारीचे युवा नेते अमोल मोरे, राम अंभोरे, सुनील मिसाळ, जया करपे, जयश्री आराख, रेणुका उबाळे, किरण डुकरे, दिक्षा वाकोडे, आशा वाघमारे, इत्यादी परीक्षार्थी उपस्थित होते.
