माजी मंत्री शिंगणे आणि केंद्रीय मंत्री जाधव यांच्या पॅनल विरोधात स्व.अजितदादा पवार शेतकरी परिवर्तन पॅनल लढत
* आ. मनोज कायंदे यांची पत्रकार परिषदेतून घोषणा !
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
बँकेतील सर्वपक्षीय समझोत्याला सुरुंग लावत आमदार मनोज कायंदे यांनी माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या 'सहकार' पॅनलविरुद्ध रणशिंग फुंकले. 'स्व. अजितदादा पवार शेतकरी परिवर्तन पॅनल'ची घोषणा आमदार विश्रामगृहातील पत्रकार परिषदेत केली. मनोज कायंदे, संतोष खांडेभराड, विजयसिंह राजपूत आणि मनीष बोरकर उपस्थित होते.
निवडणूक बिनविरोध झाली पाहिजे यासाठी खामगाव येथे सर्वपक्षीय नेत्यांनी बैठक घेतली पण ती बैठक निष्फळ ठरली आहे. माजी मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे, केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांचे उमेदवार सहकार पॅनलच्या माध्यमातून निवडणूक लढवित आहेत. तर २१ संचालक पदासाठी होत असलेल्या या निवडणुकीत १२ उमेदवार अविरोध निवडून आले आहेत. मात्र, त्यांच्या विरोधात ८ मतदार संघातून ९ संचालक पदासाठी सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघाचे आमदार मनोज कायंदे यांचे स्व. अजितदादा पवार शेतकरी परिवर्तन पॅनल रिंगणात आहे. अशाप्रकारे, डॉक्टर शिंगणे खासदार प्रतापराव जाधव यांच्या पॅनलच्या विरोधात आमदार कायंदे यांनी दंड थोपटले आहे. तब्बल 16 वर्षांनी होणारी ही निवडणूक आता रंजक वळणावर आली आहे. सुरूवातीला बिनविरोध वाटणाऱ्या निवडणुकीने वळण घेतले आहे. ९ जागांसाठी निवडणूक होणार आहे. संचालक पदांसाठी २३ ऑगस्ट रोजी मतदान होणार असून, २४ ऑगस्ट रोजी मतमोजणी करून निकाल जाहीर केला जाणार आहे. आज १२ ऑगस्ट रोजी अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध करून निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात येणार आहे. आता कोणाचा अध्यक्ष होणार याकडे जिल्हाचे लक्ष लागले आहे.
