* गाळप हंगाम पूर्वतयारीचा शुभारंभ व मिल रोलर पूजन सोहळा उत्साहात
धाड : (एशिया मंच न्यूज )
सन २०२१ पासून सुरू झालेल्या पेनगंगा साखर कारखान्याच्या प्रगतीचा आलेख दिवसेंदिवस उंचावत आहे. बुलडाणा अर्बनने दिलेले पाठबळ सार्थकी लागत असल्याचा मनस्वी आनंद होत आहे. बुलडाणा जिल्ह्याचा विकास, शेतकरी आणि कामगारांच्या हितासाठी कार्यरत असलेल्या या कारखान्याच्या पाठीशी आपण भक्कमपणे उभे आहोत, असे प्रतिपादन बुलढाणा अर्बनचे संस्थापक राधेश्याम चांडक यांनी केले.
पेनगंगा साखर कारखाना प्रा. लि. येथे गाळप हंगाम २०२६-२७ च्या पूर्वतयारीचा शुभारंभ व मिल रोलर पूजन सोहळा २६ ऑगस्ट रोजी राधेश्याम चांडक यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी ते बोलत होते. मंचावर यावेळी कडूभाऊ काळे, कमलेश संचेती, आजिनाथ हजारे, शेषराव जायभाये, डॉ. शिवकुमार गोरे, अभिनाथ शिंदे, व्यंकटेश देशमुख, सीए प्रजापती, पूजा गुंजाळ यांची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलतांना चांडक म्हणाले, कारखान्याची सुरू असलेली प्रगती समाधानाची बाब आहे. आगामी काळातही बुलडाणा अर्बन पेनगंगा साखर कारखान्याच्या पाठीशी ठामपणे उभी राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली. कारखान्याचा वाढता विस्तार आणि प्रगती पाहता चेअरमन अनिल गुंजाळ यांनी, आता बुलडाणा जिल्ह्याचे रहिवासी व्हा आणि पेनगंगा साखर कारखान्याच्या माध्यमातून जिल्ह्याच्या औद्योगिक विकासात भरीव योगदान द्या, असा सल्लाही चांडक यांनी दिला.
यावेळी बोलतांना चेअरमन अनिल गुंजाळ म्हणाले की,
राधेश्याम चांडक भाईजी यांनी बुलडाणा जिल्ह्याच्या विकासासाठी पाहिलेले औद्योगिक विकासाचे स्वप्न, शेतकरी हित तसेच तरुण वर्गासाठी रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून पेनगंगा साखर कारखान्याच्या माध्यमातून अविरत प्रयत्न सुरू राहतील, असा विश्वास व्यक्त केला. आगामी गाळप हंगामासाठी यंत्रसामग्री, मिल, बॉयलर व उत्पादन विभागाची तयारी तसेच शेतकी विभागामार्फत ऊस तोडणी-वाहतूक व्यवस्थेचे नियोजन पूर्णत्वास आले आहे. सुरळीत व कार्यक्षम गाळप हंगामासाठी कारखाना सज्ज आहे, असे त्यांनी सांगितले. कारखान्याच्या प्रगतीमध्ये ऊस उत्पादक शेतकरी, कामगार, अधिकारी व कर्मचारी यांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. सर्वांच्या सहकार्याने आगामी गाळप हंगाम यशस्वी करण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमात प्रसिद्ध व्याख्याते जयवंत आवटे यांचे 'जाऊ आनंदाच्या गावा' या विषयावर प्रेरणादायी व्याख्यान झाले. आपल्या व्याख्यानातून त्यांनी आपल्या कामावर प्रेम करावे आणि संस्थेप्रती निष्ठा ठेवावी, असा संदेश दिला.
* ३ लाख ११ हजार मेट्रिक टन गाळपाचे उद्दिष्ट
पेनगंगा साखर कारखान्याने आगामी गाळप हंगामात ३ लाख ११ हजार मे. टन गाळपाचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. त्यासाठी ऊस उपलब्धता, तोडणी-वाहतूक व्यवस्था आणि कारखान्याची तांत्रिक क्षमतेचे नियोजन करण्यात आले आहे. कारखान्याच्या माध्यमातून परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य मिळण्यासोबतच स्थानिक रोजगार आणि बुलडाणा जिल्ह्याच्या औद्योगिक विकासालाही चालना मिळत आहे, असे चेअरमन अनिल गुंजाळ यांनी सांगितले.
