बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
जिल्हा सामान्य रुग्णालयात कार्यरत मोहम्मद अफसर यांचा स्वातंत्र्यदिनी उत्कृष्ट कर्मचारी म्हणून प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला. स्वातंत्र्यदिनाच्या समारंभात जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दत्तात्रय बिराजदार, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भागवत भुसारी यांच्या हस्ते मोहम्मद अफसर यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
जिल्हा सामान्य रुग्णालयात देशाचा 80 वा स्वतंत्र दिन समारोह अत्यंत उत्साहात पार पडला. जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर दत्तात्रय बिराजदार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर डॉ. बिराजदार यांनी उपस्थित सर्व अधिकारी व कर्मचारी यांना स्वातंत्र्य दिनानिमित्त शुभ संदेश दिला. जिल्हा सामान्य रुग्णालयातील विविध विभागांमध्ये उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या काही निवडक अधिकारी आणि कर्मचारी यांचा यावेळी उत्कृष्ट कर्मचारी म्हणून प्रशस्तीपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
यामध्ये शवविच्छेदन गृहामध्ये काम करणारे मोहम्मद अफसर यांचाही समावेश आहे. गेली 29 वर्ष मोहम्मद अफसर हे शवगृहामध्ये काम करीत आहेत. आपल्या कामाशी प्रामाणिक आणि तत्पर सेवेसाठी ते सर्वत्र परिचित आहेत. केव्हाही आवाज द्या ते कायम उपस्थित असतात. संबंधित तज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत तब्बल दहा हजारहून अधिक मृतदेहांचे शिवविच्छेदन त्यांनी आजवर केले आहे. त्यांनी दिलेल्या सेवेबद्दल जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बिराजदार अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.भुसारी यांच्या हस्ते मोहम्मद अफसर यांना प्रशस्तीपत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
