* लोणार येथे एकदिवसीय कार्यशाळा उत्साहात; एमटीडीसी रिसॉर्टमध्ये केक कापून सेलिब्रेशन
लोणार : (एशिया मंच न्यूज )
राजर्षी शाहू मल्टिस्टेटच्या मेहकर विभागाने १०० कोटींच्या ठेवींचा टप्पा यशस्वीरित्या पूर्ण केला. संस्थापक अध्यक्ष संदीपदादा शेळके यांनी या उपलब्धीनिमित्त स्थानिक संचालक, खातेदार, ठेवीदार, हितचिंतक, मार्गदर्शकांचे आभार व्यक्त करीत अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. तसेच केक कापून सेलिब्रेशन करण्यात आले.
एमटीडीसी रिसॉर्टमध्ये १९ जुलै रोजी एकदिवसीय कार्यशाळा संपन्न झाली. यावेळी संस्थापक अध्यक्ष संदीपदादा शेळके, संस्थाध्यक्षा मालतीताई शेळके यांची प्रमुख उपस्थिती होती. सकाळी दहा वाजता कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रारंभी दीपप्रज्वलन करण्यात आले. संदीपदादा शेळके यांची कन्या गार्गी हिच्या हस्ते सर्व कर्मचाऱ्यांना भेटवस्तू देण्यात आली. तज्ञ मार्गदर्शक तुषार डोडिया यांनी बँकिंगबाबत सर्व कर्मचाऱ्यांची कार्यशाळा घेतली. प्रशिक्षणातील ताण हलका करण्यासाठी त्यांनी विरंगुळात्मक खेळ घेऊन वातावरण निर्मिती केली. संस्थाध्यक्षा मालतीताई शेळके यांनी मार्गदर्शन केले. यावेळी सरव्यवस्थापक दिलीप चव्हाण, सुशील गुळवे, कृष्णा सावळे, पवन सावळे, अमोल सुसर यांची उपस्थिती होती. संचालन विभागीय व्यवस्थापक गोविंद येवले यांनी केले तर आभार रवींद्र चव्हाण यांनी मानले.
* कर्मचारी ही माझी प्रॉपर्टी- संदीपदादा शेळके
आपले आधारवड भाऊसाहेब शेळके यांनी संस्थेचे रोपटे लावले. आज या रोपट्याचा वटवृक्ष झाला आहे. या यशस्वी वाटचालीमध्ये स्थानिक संचालक, खातेदार, ठेवीदार, हितचिंतक, मार्गदर्शक यांचा मोलाचा सहभाग आणि सहकार्य लाभले. तसेच संस्थेचे अधिकारी, कर्मचारी यांची निष्ठा, परिश्रम आणि सेवाभाव हा सुद्धा तितकाच महत्वाचा आहे. संस्थेचा प्रत्येक कर्मचारी ही माझी प्रॉपर्टी आहे. येणाऱ्या काळात अधिक सरस कामगिरी करुन संस्थेचा नावलौकिक वाढवावा. मी कायम तुमच्या पाठीशी आहे, असा विश्वास संदीपदादा शेळके यांनी व्यक्त केला.
