* माजी आमदार डॉ. संजयजी रायमुलकर यांचा अनोखा संकल्प
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
विश्वकर्मा सुतार समाज बांधवांच्या वतीने नुकताच समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार समारंभ कार्यक्रम अत्यंत उत्साहात आणि संत शुकदास महाराज यांच्या भक्तीमय वातावरणात 12 जुलै रोजी हिवरा आश्रम येथे मेहकर विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार संजयजी रायमुलकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली संपन्न झाला. 105 गुणवंत विद्यार्थ्यांचा या ठिकाणी सत्कार करण्यात आला. त्यानंतर आलेल्या समाज बांधवांना या ठिकाणी जेवण्याची व्यवस्था केली होती.
आपल्या अंगभूत कौशल्याने आणि कठोर परिश्रमाने शैक्षणिक क्षेत्रात दैदिप्यमान यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यासाठी या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
उत्साही वातावरणात सोहळ्याची सुरुवात कार्यक्रमाची सुरुवात भगवान श्री विश्वकर्मा यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीपप्रज्वलनाने झाली. याप्रसंगी समाजातील ज्येष्ठ विचारवंत, पदाधिकारी, मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी आपल्या मार्गदर्शनातून, बदलत्या काळासोबत समाजाने शिक्षणाची कास धरणे किती गरजेचे आहे, यावर विशेष भर दिला.
समाजातील गुणवंतांचा गौरव करणे, त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देणे ही केवळ एक औपचारिकता नसून, ते एक सामाजिक कर्तव्य आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. मेहकर-लोणार विधानसभा मतदारसंघाचे लाडके नेते माजी आमदार डॉ. संजयजी रायमुलकर साहेब यांनी. एवढ्यावरच न थांबता, त्यांनी जाहीर केले की, खामगाव येथे संपन्न होणाऱ्या 'गुणगौरव सोहळा २०२७' च्या भोजनाचा संपूर्ण खर्चही मी आनंदाने करणार! पुढच्या वर्षीच्या अन्नदानाची संपूर्ण जबाबदारी स्वतःहून स्वीकारून त्यांनी आपल्या दातृत्वाचा एक नवा आदर्श घालून दिला आहे.
संत शुकदास महाराज यांच्या मी जिवंत माणसाची सेवा करतो या वचनावर डॉ. संजयजी रायमुलकर साहेबांचा ठाम विश्वास आहे. त्यांच्या प्रत्येक कृतीतून ती समाजसेवा दिसून येते. साहेबांचे कार्य इतके अथांग आहे की त्यांच्यासाठी शब्दही अपुरे पडतील. या कार्यक्रमाला संपूर्ण जिल्ह्यातून कानाकोपऱ्यात समाज बांधव मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते.
