केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या उपस्थितीत १८ जुलैला सिंदखेडराजा येथे जनता दरबार
* १७ जुलैपर्यंत लेखी तक्रारी सादर करण्याचे आवाहन
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
सर्वसामान्य नागरिकांच्या तक्रारी व समस्या तातडीने सोडविण्यासाठी केंद्रीय आयुष, आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री तथा बुलढाणा जिल्ह्याचे खासदार प्रतापराव जाधव यांच्या उपस्थितीत १८ जुलै २०२६ रोजी सकाळी ११ वाजता सिंदखेडराजा येथील मातोश्री मंगल कार्यालयात जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांनी आपल्या तक्रारी १७ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत संबंधित तहसील कार्यालयातील विशेष जनता दरबार तक्रार कक्षात लेखी स्वरूपात सादर कराव्यात, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या जनसंपर्क कार्यालयात नागरिकांच्या विविध तक्रारी व समस्या मोठ्या प्रमाणात प्राप्त होत आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सातही विधानसभा मतदारसंघांमध्ये प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत जनता दरबारांचे आयोजन करण्यात येणार असून, या उपक्रमाची सुरुवात राष्ट्रमाता जिजाऊंची जन्मभूमी असलेल्या सिंदखेडराजा येथून होणार आहे.
१८ जुलै रोजी होणाऱ्या पहिल्या जनता दरबारात सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघातील नागरिकांच्या तक्रारी व समस्यांवर संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ऑन-द-स्पॉट निपटारा करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
नागरिकांच्या तक्रारी स्वीकारण्यासाठी सिंदखेडराजा व देऊळगाव राजा तहसील कार्यालयात विशेष जनता दरबार तक्रार कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. सिंदखेडराजा तहसील कार्यालयात ज्योती बारवाल (मो. ७२७६०९३२६९) व मनोज देशमुख (मो. ९८२३१९७००१), तर देऊळगाव राजा तहसील कार्यालयात सहाय्यक महसूल अधिकारी दिपक मोरे (मो. ९८५०८१४०३८) व बालाजी कौशल्य (मो. ९७६४६१९४२०) यांच्याकडे १७ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत लेखी तक्रारी सादर करता येणार आहेत.
१७ जुलैपर्यंत प्राप्त झालेल्या तक्रारींचाच १८ जुलै रोजीच्या जनता दरबारात समावेश करण्यात येणार असल्याने नागरिकांनी आपल्या तक्रारी विहित मुदतीत संबंधित तहसील कार्यालयातील विशेष तक्रार कक्षात सादर कराव्यात, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
