जागतिक नेत्रदान निमित्त जीवनदान जनजागृती मोहिम

जागतिक नेत्रदान निमित्त जीवनदान जनजागृती मोहिम 
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
            नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाईड बुलडाणा चे राधेश्याम चांडक अध्यक्ष याचे मार्गदर्शनाखाली  (राष्ट्रीय अंध कल्याण संघ), व बुलडाणा ऑप्थल्मिक सर्जन सोसायटी बुलडाणा, तसेच विदर्भ ऑप्थल्मिक सोसायटी यांचे संयुक्त विद्यमाने आज  १० जून २०२६ रोजी नेत्रदान जीवनदान ह्या जनजागृती मोहिम रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी ९ वाजता श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारक संगम चौक बुलडाणा येथून डॉ. दत्तात्रय बिराजदार, जिल्हा शल्य चिकित्सक बुलडाणा यांनी रॅलीला हिरवी झंडी दाखवून संगम चौक ते जयस्तंभ चौक मार्गे प्रस्थान करण्यात आले. ह्या रॅलीमध्ये सामान्य रुग्णालय नर्सिंगचे विद्यार्थी व वसंतप्रभा नर्सिंग कॉलेजचे विद्यार्थी यांचा रॅलीमध्ये प्रामुख्याने सहभाग होता. रॅलीत नेत्रदाना विषयाचे फलक लावून नेत्रदान श्रेष्ठदान,  मरणोपरांत नेत्रदान करा याबाबतच्या घोषणा देण्यात आल्या. त्यामुळे संपूर्ण परिसर भारावून गेला होता. अश्याप्रकारच्या रॅलीचे सर्व स्तरावरून कौतुक होत आहे. 
        नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाईड बुलडाणा संस्थेचे कार्यालय, गांधी भवन जयस्तंभ चौक बुलडाणा येथे रॅलीचे आगमन झाले. ह्या रॅलीत सहभाग झालेल्या सर्वांना नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाईड बुलडाणा तर्फे फळांचे व कोल्डींगचे वाटप करण्यात आले. जागतिक दृष्टिदान बद्दल संग्राम पाटील ठाणेदार बुलडाणा यांनी नेत्रदानाचे महत्व समजावून सागितले. डॉ. जोशी, डॉ. शोन चिंचोले यांनी थोडक्यात नेत्रदान जनजागृती बद्दल माहिती सांगितली. नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाईड बुलडाणाचे सचिव डॉ. वसंतराव चिंचोले वरिष्ठ नेत्रतज्ञ बुलडाणा यांनी आपल्या भाषणात सांगितले की, नेत्रदानामुळे कॉर्नियल अंधत्वामुळे अनेक रुग्णांना अंधारात चाचपरत राहावे लागते, त्यांच्या आत्मविश्वास कमी होऊन त्याचा परिणाम त्यांच्या उपजिवीकेवर होतो. नेत्रदाना नंतर चेहरा विद्रुप होतो ,मृत्यू नंतर स्वर्गाची वाट दिसत नाही किवा पुढील होणाऱ्या पिढ्या अंध म्हणून जन्माला येतात हि उणीव भरून काढण्यासाठी या कार्यक्रमाच्या माध्यमातून नेत्रदान करण्याबाबत जनजागृती मोहीमेचे आयोजन करण्यात आले. कारण या माध्यमाने तरी लोकांमध्ये नेत्रदान करण्याबद्दल त्यांचे विचार बदलतील. डॉ. विकास बाहेकर यांनी नेत्रदानाची जनजागृती होण्यासाठी व जनतेने या कार्क्रमात सक्रीय सहभाग घेण्यासाठी अंत्यविधी अथवा रक्षा विसर्जनाच्या कार्यक्रमा मध्ये नेत्रदानाची माहिती देणे आवश्यक आहे, असे सूचित केले. सदर रॅलीमध्ये डॉ. दत्तात्रय बिराजदार जिल्हा शल्य चिकित्सक बुलडाणा, संग्राम पाटील ठाणेदार बुलडाणा, डॉ. वसंतराव चिंचोले वरिष्ठ नेत्रतज्ञ, प्रा. रामकृष्ण म्हस्के उपाध्यक्ष, नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाईड बुलडाणा, डॉ. शोन चिंचोले अध्यक्ष विदर्भ ऑप्थल्मिक सोसायटी, डॉ. विकास बाहेकर, डॉ. जोशी, डॉ. रवी शिंदे, डॉ. छाजेड,  दिलीप नागरिक. मांगीलाल बुरड यांच्यासह सदस्य, कर्मचारी नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाईड बुलडाणा,  वसंतप्रभा नर्सिंग कॉलेजचे विद्यार्थी शिक्षकवृंद, सामान्य रुग्णालयाचे कर्मचारी, विद्यार्थी व शहरातील प्रतिष्ठीत नागरिक यांनी ह्या रॅलीत आपला सहभाग नोंदवला. रामकृष्ण म्हस्के यांनी कार्यक्रमाचे संचालन केले. डॉ. रवी शिंदे यांनी नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाईड बुलडाणा संस्थेतर्फे सर्वांचे आभार मानले.