* विशाल मोहिते यांना युवा गझलकार पुरस्कार प्रदान
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
गझलेतल्या लोकांना मी वारकऱ्यांसारखे समजतो. कारण वारीत गेलेला माणूस आपली जात, आपला धर्म या सगळ्या गोष्टी बाजूला सारून एकमेकांना आनंदाने मिठी मारत असतो. गझलेमध्ये मला सुद्धा तसेच बघायला मिळाले. आपली जात-पात, धर्म सोडून माणूस माणसाकडे माणूस म्हणून बघायला शिकतो. गझल कविता का लिहितो ? हा प्रश्न विचारणारे आई- वडील आज एखादी नवीन गझल, कविता लिहिली का? यासाठी प्रोत्साहन देत आहे. एकंदरीत गझलेने वृत्त तर शिकवलेच, पण वृत्ती सुद्धा बदलायला शिकवली, अशा भावना युवा गझकार पुरस्कार प्राप्त विशाल मंदा अशोकराव मोहिते यांनी व्यक्त केल्या.
गझल मंथन संस्थेच्या वतीने दिला जाणारा पहिला राज्यस्तरीय युवा गझलकार पुरस्कार विशाल मोहिते यांना ७ जून रोजी गोरेगाव, मुंबई येथे गझल नवाज भीमराव पांचाळे, गझलकार डॉ. शिवाजी काळे यांच्या हस्ते तसेच तर डॉ स्नेहल कुलकर्णी, गोपाल मापारी, श्रीपाद या मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला.
यावेळी पुरस्कारला उत्तर देताना ते बोलत होते. एखादा कलाकार किती चांगला आहे, त्यापेक्षा त्याचा बंगला, गाडी, नोकरी किती चांगली आहे? या निकषाचा विचार करुन हल्ली पुरस्काराचे वितरण होत असतांना गझलमंथन संस्थेच्या निवड समितीने माझ्या सारख्या फाटक्या माणसाची निवड करणे, या बदद्ल मी कृतज्ञ असल्याचे विशाल मोहिते यांनी सांगितले.
विशाल मोहिते यांनी हा पुरस्कार आपल्या आई- वडीलांना समर्पित केला असून पुरस्काराचे श्रेय भाऊ, बहिण, जिवलग मित्र अभिषेक चोपडे यांना दिले आहे. त्यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल समाजातील विविध घटकांकडून त्यांच्यावर कौतूकाचा वर्षाव होत आहे.
* आपल्या वाट्याची दुनिया हिरवी करुया..
ना कुणाचा हात पाठी, ना घराणे गाजलेले, माझियापासून झाला हा सुरू इतिहास माझा. या गझलकार वंदनाताई पाटील यांच्या ओळीचा आधार घेऊन विशाल मोहिते यांनी आपल्या गझल लेखनाच्या प्रवासाबद्दल सविस्तर सांगितले. गझलेनेच राज्यभर ओळख प्राप्त करून दिली. २०२३ मध्ये 'लक्ष्मण जेवणे पुरस्कार' मिळाल्यानंतर आता २०२६ मध्ये युवा गझलकार पुरस्कार मिळाला याचे आत्मिक समाधान आहे. आतापर्यंत एक प्रयत्न केला की, चांगली गझल नाही तर स्वतःची गझल लिहिण्याचा. यापुढेही स्वतःची गझल लिहिण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करणार असून आपल्या वाट्याची दुनिया हिरवी करुया, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.
