मराठी भाषेच्या सन्मानासाठी युवक काँग्रेस आक्रमक.. * विधानसभा अध्यक्षांना वाचायला पाठवले बाराखडीचे पुस्तक !

मराठी भाषेच्या सन्मानासाठी युवक काँग्रेस आक्रमक..
 * विधानसभा अध्यक्षांना वाचायला पाठवले बाराखडीचे पुस्तक !
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
          विधानसभेचा अध्यक्ष म्हणून मराठी भाषेचा शुद्ध आणि आदर्श वापर करणे ही राहुल नार्वेकर यांची नैतिक जबाबदारी आहे. मात्र शोकप्रस्तावासारख्या गंभीर विषयावर बोलताना त्यांनी अनेक शब्द चुकीच्या पद्धतीने उच्चारले तसेच काही शब्द वाचतानाही अडखळल्याचे दिसून आले. त्यामुळे मराठी भाषेचा गौरव कमी झाला असून राज्यातील मराठीप्रेमी नागरिकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. राहुल नार्वेकर यांची मराठी भाषा सुधारण्यासाठी बुलढाणा युवक काँग्रेसच्या वतीने चक्क मराठी मुळाअक्षरांचे - बाराखडीचे पुस्तक पाठवण्यात आले आहे. यावेळी मराठी भाषेचा अवमान सहन केला जाणार नाही, असा इशारा देत भारतीय युवक काँग्रेसने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या मराठी उच्चारांबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.

       २४ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत विधानसभा अध्यक्षांना बाराखडीच्या पुस्तकासोबत पाठविण्यात आलेल्या निवेदनात युवक काँग्रेसने म्हटले आहे की, मराठी ही केवळ संवादाची भाषा नाही, तर महाराष्ट्राच्या संस्कृतीचा, परंपरेचा आणि स्वाभिमानाचा पाया आहे. राज्यातील घटनात्मक पदांवर असलेल्या व्यक्तींनी भाषेच्या शुद्धतेबाबत अधिक सजग राहणे आवश्यक आहे. मराठी भाषेचा सन्मान राखावा आणि सार्वजनिक जीवनातील मान्यवरांनी भाषेच्या योग्य वापराबाबत अधिक जागरूक व्हावे, या उद्देशाने विधानसभा अध्यक्षांना बाराखडीचे पुस्तक भेट म्हणून पाठविण्यात आल्याचे युवक काँग्रेसने स्पष्ट केले.

        या अनोख्या आंदोलनाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू असून, मराठी भाषेच्या प्रश्नावर युवक काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे. मराठीच्या सन्मानासाठी कोणत्याही स्तरावर आवाज उठविण्यास मागे-पुढे पाहणार नाही, असा इशारा महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे महासचिव तथा प्रवक्ता विश्वदिप पडोळ, प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव शिवराज पाटील, बुलढाणा युवक काँग्रसेचे कोषाध्यक्ष संदिप पैठणे, शे.अनिस, विनोद गवई, संदिप बोर्डे, गौरव नाईक यांच्यासह युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.