सरकार झुकले, पाच दिवसांचा संघर्ष थांबला ; रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित !* गिरीश महाजनांची शिष्टाई ; मुख्यमंत्र्यांसोबत होणार बैठक

सरकार झुकले, पाच दिवसांचा संघर्ष थांबला ; रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित !
* गिरीश महाजनांची शिष्टाई ;  मुख्यमंत्र्यांसोबत होणार बैठक 
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
        सरसकट, विना अट-विना शर्त कर्जमुक्ती, हक्काचा पीकविमा आणि शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेले शेतकरी नेते रविकांत तुपकर यांचे अन्नत्याग आंदोलन अखेर शुक्रवारी, १९ जून रोजी तूर्त स्थगित करण्यात आले. राज्यभर उग्र होत चाललेल्या आंदोलनाची दखल घेत राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी थेट आंदोलनस्थळी येऊन तुपकर यांच्याशी चर्चा केली. सरकार शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक असल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यासाठी चार दिवसांचा वेळ मागण्यात आला. अखेर उपस्थित शेतकऱ्यांच्या आग्रहाचा आणि मुख्यमंत्री व मंत्री गिरीश महाजन यांच्या विनंतीचा मान राखत रविकांत तुपकर यांनी आईच्याहस्ते ज्युस घेऊन अन्नत्याग आंदोलन स्थगित केले.

         मात्र हा संघर्ष संपलेला नसून केवळ स्थगित करण्यात आल्याचे स्पष्ट करत, चार-पाच दिवसांत ठोस आणि सकारात्मक मार्ग निघाला नाही तर राज्यभरातील शेतकरी पुन्हा एकदा रस्त्यावर उतरतील आणि आंदोलन अधिक तीव्र केले जाईल, असा थेट इशारा रविकांत तुपकर यांनी सरकारला दिला आहे. दरम्यान, सलग पाच दिवस अन्नत्याग केल्यामुळे प्रचंड प्रकृती खालावलेल्या तुपकर यांना पुढील वैद्यकीय जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

 * पाच दिवसांत आंदोलनाने घेतले राज्यव्यापी स्वरूप : 

        १५ जून रोजी बुलढाण्यात सुरू झालेले हे अन्नत्याग आंदोलनाने राज्यव्यापी स्वरूप धारण केले होते. तुपकर यांच्या प्रकृतीत दिवसेंदिवस बिघाड होत असताना शासनाकडून कोणतीही ठोस भूमिका समोर येत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली होती. गावोगावी रास्तारोको, निदर्शने, टायर जाळून आंदोलन, तहसील कार्यालयांवरील मोर्चे, शासकीय कार्यालयाची कार्यालय जाळपोळ , जिल्हाधिकारी कार्यालयात फटाके फोडणे, एसटी बस पेटवणे, तलाठी कार्यालय जाळणे, व्यापारी बंद आणि विविध प्रकारच्या आक्रमक आंदोलनांनी राज्यातील अनेक भाग दणाणून गेले. अकोला-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गापासून ते समृद्धी महामार्गापर्यंत शेतकरी रस्त्यावर उतरले. देऊळगाव मही येथे आंदोलनाच्या पाचव्या दिवशी शंभर टक्के बंद पाळण्यात आला. चिखली तालुक्यातील मेरा खु. येथे रास्तारोको करण्यात आला तर सिंदखेडराजा तालुक्यातील कंडारी भंडारी येथे संतप्त शेतकऱ्यांनी थेट समृद्धी महामार्ग रोखून शासनाविरोधात जोरदार आंदोलन छेडले.

         बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनादरम्यान एका शेतकऱ्याने आत्मदहनाचा प्रयत्न केल्याने परिस्थितीचे गांभीर्य आणखी वाढले होते. राज्यभरातून उफाळून येणारा हा संताप आणि तुपकर यांच्या ढासळणाऱ्या प्रकृतीमुळे सरकारवर मोठा दबाव निर्माण झाला होता.

* मुख्यमंत्र्यांचा निरोप घेऊन आलो : 

        आंदोलनस्थळी पोहोचल्यानंतर मंत्री गिरीश महाजन यांनी रविकांत तुपकर यांच्याशी सविस्तर चर्चा केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निरोप घेऊन मी तुमच्यापर्यंत आलो आहे. सरकार शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक आहे. भविष्यात तुम्हाला शेतकऱ्यांसाठी मोठे काम करायचे आहे, त्यामुळे अन्नत्याग आंदोलन सोडा, अशी विनंती महाजन यांनी केली.

         यावेळी तुपकर यांनी अंतिम निर्णय उपस्थित शेतकऱ्यांवर सोपवला. आंदोलनस्थळी जमलेल्या शेतकऱ्यांनी एकमुखाने उपोषण मागे घेण्याची विनंती केल्यानंतर सरकारला चार दिवसांचा अवधी देण्याचा निर्णय घेण्यात आला.

* संघर्ष स्थगित ; लढा कायम : 

          आईच्या हस्ते ज्युस स्वीकारून रविकांत तुपकर यांनी अन्नत्याग आंदोलन स्थगित केले असले तरी शेतकऱ्यांच्या मागण्यांवरील लढा कायम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आता सरकार आणि शेतकरी प्रतिनिधींमध्ये होणाऱ्या बैठकीकडे राज्यभरातील लाखो शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. पाच दिवसांच्या संघर्षानंतर सरकारने संवादाचा मार्ग स्वीकारला असला तरी कर्जमुक्ती आणि पीकविम्याच्या प्रश्नांवर प्रत्यक्ष निर्णय होतो की नाही, यावर पुढील आंदोलनाची दिशा ठरणार आहे. त्यामुळे पुढील चार -पाच दिवस हे राज्यातील शेतकरी आंदोलनाच्या दृष्टीने अत्यंत निर्णायक मानले जात आहेत.