तुपकरांच्या अन्नत्याग आंदोलनाचा वणवा राज्यभर भडकला!
* चौथ्या दिवशी प्रकृती गंभीर ; शुगर ५० च्या खाली
* आंदोलनांना हिंसक वळण...अकोला–हैदराबाद महामार्गावर टायर जाळले ; जामनेरमध्ये शासनाची टाटा सुमो पेटवली * मेहकर, हिवरा आश्रम येथे तलाठी कार्यालय जाळण्याचा प्रयत्न
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
शेतकरी कर्जमुक्तीच्या मागणीसाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी सुरू केलेल्या अन्नत्याग आंदोलनाच्या चौथ्या दिवशी आंदोलनाने आता संपूर्ण महाराष्ट्रात अभूतपूर्व आणि आक्रमक स्वरूप धारण केले आहे. एका बाजूला तुपकर यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक बनत चालली असताना दुसऱ्या बाजूला शासनाच्या उदासीनते विरोधात संतप्त शेतकऱ्यांचा उद्रेक रस्त्यावर दिसू लागला आहे. राज्यभर ठिकठिकाणी निदर्शने, रास्ता रोको, टायर जाळणे, सरकारी मालमत्तांवर हल्ल्याचे प्रयत्न अशा घटना घडत असून परिस्थिती चिघळत चालली आहे. रविकांत तुपकर यांनी १५ जूनपासून बुलढाण्यातील निवासस्थानी संपूर्ण कर्जमुक्ती, पीकविमा आणि शेतकरी हिताच्या विविध मागण्यांसाठी अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. गेल्या चार दिवसांपासून त्यांनी अन्नाचा कणही घेतलेला नसल्याने त्यांच्या प्रकृतीवर गंभीर परिणाम झाला आहे. वैद्यकीय तपासणीत त्यांची रक्तातील साखरेची पातळी ५० च्या खाली गेल्याचे समोर आले आहे. त्यामुळे अशक्तपणा, चक्कर येणे, तीव्र डोकेदुखी, थकवा अशी लक्षणे वाढली असून पुढील काही तासांत परिस्थिती अधिक गंभीर होऊ शकते, असा इशारा वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे. "हायपोग्लायसेमिया"चा धोका निर्माण झाल्याने समर्थक आणि शेतकरी वर्गामध्ये तीव्र चिंता व्यक्त होत आहे.
* प्रशासनाची दखल नाही ; शेतकऱ्यांचा संताप अनावर..
तुपकर यांच्या प्रकृतीत सातत्याने बिघाड होत असतानाही शासन किंवा प्रशासनाकडून कोणतीही ठोस भूमिका समोर आलेली नसल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांकडून केला जात आहे. याच संतापातून राज्यभरातील शेतकरी रस्त्यावर उतरले असून आंदोलनाला अधिक आक्रमक वळण मिळाले आहे.
* वाशिममध्ये राष्ट्रीय महामार्गावर टायर जाळून आंदोलन..
वाशिम येथे संतप्त शेतकऱ्यांनी अकोला–हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर टायर जाळून सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. सरसकट आणि विनाअट कर्जमाफी द्या, शेतकऱ्यांच्या मागण्या तात्काळ मान्य करा अशा घोषणा देत आंदोलनकर्त्यांनी शासनाला इशारा दिला. या आंदोलनामुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.
* जामनेरमध्ये शासनाची टाटा सुमो पेटवली
जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात आंदोलनाचा उद्रेक अधिक तीव्र स्वरूपात दिसून आला. तालुका कृषी अधिकारी कार्यालयासमोर उभी असलेली महाराष्ट्र शासनाची टाटा सुमो अज्ञात आंदोलकांनी मध्यरात्री पेटवून दिली. गाडीच्या काचा फोडून आतून आग लावल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून या घटनेने प्रशासनात खळबळ उडाली आहे.
* मेहकर, हिवरा आश्रम येथे तलाठी कार्यालय जाळण्याचा प्रयत्न ! मुरादपूर येथील टोल नाका पेटविला..
आंदोलनाच्या तिसऱ्या रात्री मेहकर आणि हिवरा आश्रम येथे तलाठी कार्यालयांना लक्ष्य करण्यात आले. अज्ञात आंदोलकांनी कार्यालय पेटवून देण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली असून या घटनांमुळे खळबळ उडाली आहे. या प्रकारामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.
* जिल्हाधिकारी कार्यालयात पोतडीभर फटाके घेऊन घुसले आंदोलक..
बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयातही आंदोलनाची धग पोहोचली. दुपारी सव्वा दोन वाजण्याच्या सुमारास आंदोलक शेतकरी ॲड. प्रवीण सुरडकर यांनी पोतडीभर फटाके घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मागील प्रवेशद्वारातून प्रवेश केला आणि कार्यालय परिसरातच फटाक्यांची लड फोडली. अचानक झालेल्या स्फोटक आवाजामुळे संपूर्ण जिल्हाधिकारी कार्यालयात खळबळ उडाली. पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करून त्यांना ताब्यात घेतले.
* ॲड. शर्वरी तुपकरांचा कृषी अधीक्षक कार्यालयात ठिय्या..
दरम्यान, रविकांत तुपकर यांची प्रकृती चिंताजनक बनल्याच्या पार्श्वभूमीवर ॲड. शर्वरी तुपकर यांनी बुलढाणा जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयात शेतकरी आंदोलकांसह ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. प्रशासनाने तातडीने निर्णय घ्यावा आणि शेतकऱ्यांच्या मागण्यांवर सकारात्मक भूमिका जाहीर करावी, अशी मागणी त्यांनी केली. यावेळी पिक विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या गळ्यात हार घालून गांधीगिरी गांधीगिरी पद्धतीने निषेध नोंदवण्यात आला. दुसरीकडे मलकापुरात आक्रमक शेतकरी आंदोलकांनी विहिरीत जलसमाधी आंदोलन केले..
* शासनासमोर मोठे आव्हान; परिस्थिती आणखी चिघळण्याची शक्यता...
रविकांत तुपकर यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा वणवा आता बुलढाण्यापुरता मर्यादित राहिलेला नाही. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये त्याचे तीव्र पडसाद उमटत आहेत. तुपकर यांची प्रकृती अधिक खालावल्यास आणि शासनाने तातडीने हस्तक्षेप न केल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. चौथ्या दिवशी आंदोलन एका निर्णायक टप्प्यावर पोहोचले असून संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष आता बुलढाण्याकडे लागले आहे.
