जागतिक नेत्रदान दिन रॅली मध्ये सक्रिय सहभाग घ्या : राधेश्याम चांडक
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाईड (राष्ट्रीय अंध कल्याण संघ) बुलडाणा व बुलडाणा ऑप्थल्मिक सर्जन सोसायटी बुलडाणा तसेच विदर्भ ऑप्थल्मिक सोसायटी यांचे संयुक्त विद्यमाने जागतिक नेत्रदान दिन साजरा करण्याच्या दृष्टीने १० जून २०२६ रोजी नेत्रदान जीवनदान ह्या जनजागृती मोहिमेचे आयोजन केले आहे. सकाळी ९ वाजता श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारक संगम चौक बुलडाणा येथून रॅली निघणार असून ह्या रॅलीची सांगता नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाईड बुलडाणा संस्थेचे कार्यालय, गांधी भवन जयस्तंभ चौक बुलडाणा येथे होणार आहे.
सदर रॅलीमध्ये डॉ. दत्तात्रय बिराजदार, जिल्हा शल्य चिकित्सक बुलडाणा, डॉ. अमोल गीते जिल्हा आरोग्य अधिकारी जि.प. बुलडाणा, डॉ. वसंतराव चिंचोले वरिष्ठ नेत्रतज्ञ बुलडाणा, प्रा. रामकृष्ण म्हस्के उपाध्यक्ष, नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाईड बुलडाणा, डॉ. शोन चिंचोले अध्यक्ष विदर्भ ऑप्थल्मिक सोसायटी, मनोज मेरत सहा. आयुक्त समाज कल्याण बुलडाणा, प्रमोद येंडोले जिल्हा दिव्यांग कल्याण अधिकारी जि.प. बुलडाणा, दिलीप नागरिक, मांगीलाल बुरड सदस्य नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाईड बुलडाणा ह्या मान्यवरांचे रॅलीमध्ये सहभाग असणार आहे. नेत्रदाना मुळे कॉर्नियल अंधत्वामुळे अनेक रुग्णांना अंधारात चाचपरत राहावे लागते, त्यांच्या आत्मविश्वास कमी होऊन त्याचा परिणाम त्यांच्या उपजिवीकेवर होतो. हि उणीव भरून काढण्यासाठी या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. तसेच बुलडाणा ऑप्थल्मिक सर्जन सोसायटीचे नेत्रतज्ञ, नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाईडचे सदस्य/कर्मचारी, वसंतप्रभा नर्सिंग कॉलेजचे शिक्षकवृंद व विद्यार्थी या रॅलीमध्ये सहभागी होणार आहे. ज्या नागरिकांना या कार्यक्रमात सहभाग व्हायचे असेल व ज्यांनी नेत्रदानासाठी संमती दिली असेल अश्या सर्व नेत्रदात्यांचे या कार्यक्रमात स्वागत करण्यात येईल. तरी सर्व बंधू भगिनींनी ह्या रॅलीमध्ये आपला सक्रीय सहभाग नोंदवावा, असे आवाहन राधेश्याम चांडक, अध्यक्ष नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाईड बुलडाणा यांनी केले आहे.
