बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
जिल्हा सामान्य रुग्णालयात अत्याधुनिक एमआरआय सेंटरचे लोकार्पण महाराष्ट्र दिनाच्या औचित्याने पार पडले. या नव्या सुविधेमुळे जिल्ह्यातील हजारो रुग्णांना मोठा दिलासा मिळणार असून, यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश आल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
मनसेचे बुलढाणा तालुकाध्यक्ष अमोल रिंढे पाटील यांनी या सुविधेसाठी प्रशासकीय स्तरावर सातत्याने पाठपुरावा केला होता. सहसंचालक आरोग्य सेवा आयुक्तालय मुंबई, आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी तसेच जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याशी त्यांनी वेळोवेळी पत्रव्यवहार करून बुलढाणा जिल्ह्यासाठी एमआरआय सेंटरची आवश्यकता अधोरेखित केली होती. याशिवाय मनसेने विविध आंदोलनांच्या माध्यमातूनही प्रशासनाचे लक्ष या महत्त्वाच्या मागणीकडे वेधले होते.
या सेंटरच्या सुरूवातीमुळे जिल्ह्यातील गोरगरीब रुग्णांना एमआरआय तपासणीसाठी अकोला, औरंगाबाद किंवा इतर शहरांमध्ये धाव घेण्याची गरज राहणार नाही. स्थानिक पातळीवरच अत्याधुनिक आणि कमी खर्चात तपासणी उपलब्ध होणार असल्याने वेळ, पैसा आणि मानसिक त्रासाची मोठ्या प्रमाणात बचत होणार आहे.
याबाबत अमोल रिंढे पाटील म्हणाले की, ही सुविधा सर्वसामान्य नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. जिल्ह्यातील आरोग्य सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी मनसेचा पाठपुरावा आणि लढा यापुढेही कायम राहील. या उपक्रमामुळे जिल्ह्याच्या आरोग्य व्यवस्थेत महत्त्वाची भर पडली आहे.
