अभूतपूर्व कामगिरी नोंदवत ठरले जिल्ह्यातील पहिले वकील*न्यूयॉर्क बार परीक्षेत ॲड. हर्षवर्धन बोंद्रे यांचे उत्तुंग यश !

अभूतपूर्व कामगिरी नोंदवत ठरले जिल्ह्यातील पहिले वकील
*न्यूयॉर्क बार परीक्षेत ॲड. हर्षवर्धन बोंद्रे यांचे उत्तुंग यश !
चिखली : (एशिया मंच न्यूज )
         जिद्द, परिश्रम आणि ध्येयवेड्या वृत्तीच्या बळावर बुलढाणा जिल्ह्यातील ॲड. हर्षवर्धन राहुलभाऊ बोंद्रे यांनी जागतिक स्तरावरील अत्यंत प्रतिष्ठेची व कठीण समजली जाणारी न्यूयॉर्क बार परीक्षा यशस्वीरीत्या उत्तीर्ण करत ऐतिहासिक कामगिरी नोंदवली आहे. या परीक्षेत यश मिळवणारे ते जिल्ह्यातील पहिले वकील ठरले असून, त्यांच्या या कर्तृत्वाने संपूर्ण जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला, हे विशेष..!

       माजी आमदार राहुलभाऊ बोंद्रे व हिरकणी महिला अर्बनच्या अध्यक्षा ॲड. वृषालीताई बोंद्रे यांचे सुपुत्र असलेल्या ॲड. हर्षवर्धन यांनी आपल्या गुणवत्तेच्या बळावर सातासमुद्रापार भारतीय कर्तृत्वाचा झेंडा रोवला आहे. त्यांनी दिल्ली येथील जिंदाल ग्लोबल लॉ स्कूलमधून एलएलबीची ( LLB) पदवी संपादन केली, त्यानंतर अमेरिकेतील यूसीएलए (UCLA) या लॉस एंजेलिस येथील विख्यात विश्वविद्यालयातून एलएलएम (LLM) ही उच्च पदवी प्राप्त केली. या भक्कम शैक्षणिक पायावर उभे राहून त्यांनी त्या पुढे जात न्यूयॉर्क बार परीक्षेचे आव्हान समर्थपणे पेलले.

जागतिक कायदा क्षेत्रात ‘गोल्ड स्टँडर्ड’ मानली जाणारी न्यूयॉर्क बार परीक्षा अत्यंत कठीण व स्पर्धात्मक आहे. आंतरराष्ट्रीय व्यापार, वित्तीय व्यवहार आणि बहुराष्ट्रीय करारांमध्ये न्यूयॉर्क कायद्याचे विशेष महत्त्व असल्याने ही परीक्षा उत्तीर्ण होणे म्हणजे जागतिक दर्जाच्या कायदेतज्ज्ञ म्हणून मान्यता मिळवण्यासारखे आहे. अत्यल्प यशप्रमाण असलेल्या या परीक्षेत हर्षवर्धन यांनी मिळवलेले यश त्यांच्या असामान्य बुद्धिमत्ता, चिकाटी आणि कठोर परिश्रमाचे द्योतक आहे.

        या यशामुळे त्यांच्यासमोर आता आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामांकित लॉ फर्म्समध्ये कार्य करण्याचे तसेच सीमापार कायदेशीर व्यवहार हाताळण्याचे विस्तीर्ण दालन खुले झाले आहे. पूर्वीच्या काळात उच्च कायदेपदवीधारकांना ‘बॅरिस्टर’ म्हणून गौरवले जाई; त्याच परंपरेचा मान राखत हर्षवर्धन यांनी प्राप्त केलेले हे यश त्यांना जागतिक पातळीवर ‘अ‍ॅटर्नी’ म्हणून ओळख मिळवून देणारे ठरले आहे. हर्षवर्धन बोंद्रे यांच्या या अभूतपूर्व यशाबद्दल सर्व स्तरांतून कौतूकाचा वर्षाव होत असून, त्यांच्या कर्तृत्वाने नव्या पिढीसमोर प्रेरणेचा दीप प्रज्वलित झाला आहे.


* कर्मयोगी तात्यासाहेबांच्या स्वप्नपूर्तीचा आनंद सुखावणारा : ॲड हर्षवर्धन बोंद्रे

         कर्मयोगी तात्यासाहेबांनी शैक्षणिक, सहकार क्षेत्रात क्रांती घडवून आणली. त्यांच्या दुरदुष्टी व कल्पक नेतृत्वातून अनेकांचे जीवनमान उंचावले. अनेक आघाड्यांवर काम करत असतांना कायद्याचे उच्च शिक्षण घेण्याचे त्यांचे स्वप्न अधुरे राहिले होते. अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथून कायद्याचे उच्च शिक्षण यशस्वीरित्या पूर्ण करुन कर्मयोगी भाऊंचे अधुरे स्वप्न मला साकरता आले. आजोबांचे संस्कार व आई- वडिलांचे मार्गदर्शन यामुळे हा यशस्वी प्रवास घडून आला. कर्मयोगी तात्यासाहेबांच्या स्वप्नपूर्तीचा आनंद सुखावणारा असल्याच्या भावना ॲड हर्षवर्धन राहुल बोंद्रे यांनी केले.