जिल्हाधिकारी कचेरीवर धडाडला लोकशाहीचा चौथा स्तंभ !
* जाहिरात दरात १५० टक्के वाढीसाठी बुलढाण्यात व्हॉईस ऑफ मीडियाचे धरणे आंदोलन
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
अन्यायकारक धोरणे बदला, अन्यथा वृत्तपत्र उद्योग बंद पडेल ! अशी आक्रमक भूमिका घेत आज 1 एप्रिल रोजी 'व्हॉईस ऑफ मीडिया' संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दोन तास धरणे आंदोलन करण्यात आले. गेल्या सहा वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मागण्या आणि पत्रकारांवर होणारे जीवघेणे हल्ले याविरोधात पत्रकारांनी जिल्हाधिकारी कार्यालय दणाणून सोडले. संघटनेने राष्ट्रीय अध्यक्ष अनिल म्हस्के यांच्या मार्गदर्शनात जिल्हाध्यक्ष वैभवराजे मोहिते यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलना नंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मागण्यांचे निवेदन पाठविण्यात आले.
सन २०१९ पासून कागद, शाई, प्रिंटिंग मटेरियल आणि वीज दरात प्रचंड वाढ झाली आहे. मात्र, शासनाचे जाहिरात दर ७ वर्षांपूर्वीचेच असल्याने वृत्तपत्रे आर्थिक संकटात सापडली आहेत. यावर उपाय म्हणून जाहिरात दरात तातडीने १५० टक्के वाढ करावी. ई-टेंडर जाहिराती संक्षिप्त न छापता पूर्ण स्वरूपात द्याव्यात. जाहिरात देयके ३० दिवसांच्या आत व्याजासह अदा करावीत.लघु व मध्यम वृत्तपत्रांना जाहिरात वाटपात समान संधी मिळावी, अशा मागण्या करत पत्रकारांवरील दडपशाहीचा तथा राज्यात सुरू असलेल्या 'टार्गेट' पॉलिटिक्सचा निषेध करण्यात आला. अकोल्यातील पत्रकारांना झालेली कोठडी, नांदेडमधील महिला पत्रकार मुक्ता कदम यांच्यावर दाखल झालेले गुन्हे आणि अर्धापूर येथील पत्रकार मनोज मन्नपूर्वे यांच्या अपहरणाचा प्रयत्न, या घटना लोकशाहीसाठी घातक असल्याचे यावेळी आंदोलकांनी नमूद करत जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर केले.
यावेळी प्रदेश कार्यकारिणी प्रतिनिधी अरुण जैन, विदर्भ संघटक सिद्धार्थ आराख, माजी जिल्हाध्यक्ष लक्ष्मीकांत बगाडे, कृष्णा सपकाळ, तालुका अध्यक्ष डॉ.विजय जट्टे, नितीन कानडजे, शौकत शहा, प्रवीण थोरात, हर्षनंदन वाघ, शेख नदीम, आत्माराम सोनूने, साबीर अली, सचिन लहाने, सोहम घाडगे, सुखनंदन इंगळे, अक्षय थीगळे, किरण नाईक, जाकीर शाह, शेख इद्रिस, दीपक मोरे, नीलेश राऊत, सुनील तिजारे, सोहील शाह, सुनील खंडारे, संदीप वानखेडे, पवन सोनारे, नीलेश जोशी, संजय जाधव, सागर जयस्वाल, राम चतुर यांच्यासह अनेक पत्रकार उपस्थित होते., अशी माहिती व्हॉईस ऑफ मीडियाचे जिल्हा प्रसिध्दी प्रमुख संदीप वंत्रोले यांनी दिली आहे.
वाढत्या महागाईमुळे शासनाने तारक १५० टक्के दरवाढ द्यावी. जाहिरात वाटपातील वशिलेबाजी थांबवून सर्व जाहिराती माहिती खात्यामार्फत देण्यात यावी. पत्रकार संरक्षण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी, असे न झाल्यास देशभर तीव्र आंदोलन छेडणार असल्याचा इशारा व्हॉईस ऑफ मीडियाचे प्रदेश कार्यकारिणी प्रतिनिधी अरुण जैन यांनी दिला.
