सायकलिस्ट ओम जाधव यांचा राधेश्याम चांडक यांच्या हस्ते सत्कार

सायकलिस्ट ओम जाधव यांचा राधेश्याम चांडक यांच्या हस्ते सत्कार
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
             येथील सायकलिंग क्लबचे सदस्य ओम जाधव यांनी आपल्या जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर क्रीडा क्षेत्रात बुलडाणा जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करत इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये मानाची नोंद मिळवली आहे. ओम जाधव यांनी जून 2025 मध्ये सायकलिंगची सुरुवात केली. सुरुवातीपासूनच त्यांनी नियमित सराव करत बुलडाणा सायकलिंग क्लबतर्फे आयोजित बुलडाणा ते पंढरपूर वारीत सहभाग घेतला आणि ती यशस्वीरीत्या पूर्ण केली. 
       या वारीतून प्रेरणा घेऊन त्यांनी सायकलिंगमध्ये अधिक प्रगती करण्याचा निर्धार केला.केवळ 19 व्या वर्षी त्यांनी खडतर अशा BRM (Brevets Randonneurs Mondiaux) स्पर्धांमध्ये सहभागी होत आपली क्षमता सिद्ध केली. त्यांनी 200 किमी, 300 किमी, 400 किमी आणि 600 किमी असे सर्व टप्पे निश्चित वेळेत पूर्ण करत ‘Super Randonneur (SR)’ ही मानाची पदवी मिळवली. विशेष म्हणजे त्यांनी 600 किमी अंतर दोन वेळा यशस्वीरित्या पूर्ण करून आपली जिद्द दाखवून दिली.त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत, महाराष्ट्रातून सर्वात कमी वयात SR पदवी मिळवणारा सायकलिस्ट म्हणून इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये त्यांची नोंद करण्यात आली. यासाठी त्यांना मानाचे मेडलही प्रदान करण्यात आले.हे मेडल बुलडाणा सायकलिंग क्लबचे मार्गदर्शक व बुलडाणा अर्बनचे संस्थापक राधेश्याम चांडक यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.या यशाचे श्रेय ओम जाधव यांनी आपले मार्गदर्शक व क्लबचे अध्यक्ष दीपक क्यावल, सरदारसिंग ठाकूर, विष्णू भगवान गाढे,संजय मयुरे , कैलास जैस्वाल तसेच क्लबमधील सर्व सदस्य यांना दिले आहे. तसेच या प्रवासात खंबीरपणे साथ देणाऱ्या त्यांच्या कुटुंबीयांचेही त्यांनी आभार मानले.
        यावेळी त्यांनी आपले भाव व्यक्त करत सांगितले की, “अशा महान व्यक्तींच्या हस्ते सन्मानित होणे हा माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे .ओम जाधव यांच्या यशामुळे बुलडाणा जिल्ह्यातील तरुणांमध्ये क्रीडा क्षेत्राबद्दल नवचैतन्य निर्माण झाले असून, त्यांच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.