क्रांतिकारी शेतकरी संघटना देणार शेतकऱ्यांच्या मुलांना प्रशिक्षण
* महाबळेश्वरला दोन दिवशीय शिबिर : राज्य कार्यकारिणीची बैठकही होणार
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने राज्यभरातील प्रमुख पदाधिकारी, निवडक कार्यकर्ते व युवा शेतकरी पुत्रांसाठी दोन दिवसीय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात आजवरची शेतकरी चळवळ आणि भविष्यातील शेतकरी चळवळीची दिशा, ध्येयधोरणे तसेच कृषी क्षेत्रातील उद्योग, व्यवसाय व रोजगार याबाबत सविस्तर चर्चा केली जाणार असून राज्यस्तरीय बैठक देखील होणार आहे. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रविकांत तुपकर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती राहणार आहे. महाबळेश्वर तालुक्यातील तापोळा येथे हे शिबिर व राज्य कार्यकारणीच्या बैठक होणार असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष राजकुमार कसबे व राज्य समन्वयक सचिन पांडुळे यांनी दिली आहे.
शेतकऱ्यांच्या न्याय हक्काची लढाई लढण्यासाठी सर्वात अग्रेसर असणारी संघटना म्हणून क्रांतिकारी शेतकरी संघटनेला राज्यभरात ओळखले जाते. शेतकऱ्यांची मुलुख मैदानी तोफ म्हणून राज्यभरात ओळखले जाणारे रविकांत तुपकर या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आहेत. गल्ली ते दिल्ली पर्यंत आंदोलन करून शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी जीवाची पर्वा न करता लढनारे नेतृत्व म्हणून रविकांत तुपकरांकडे पाहिले जाते. त्यांनी स्थापन केलेली क्रांतिकारी शेतकरी संघटना देखील राज्यभरात याच पद्धतीने शेतकऱ्यांसाठी काम करत आहे. आपल्या संघटनेतील प्रत्येक कार्यकर्ता हा प्रशिक्षित असावा, शेतकरी चळवळ आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी ठरवले जाणारे धोरण याबाबत सर्वांना ज्ञान असले पाहिजे, त्यांची वैचारिक बैठक पक्की असली पाहिजे यासाठी रविकांत तुपकर यांच्या प्रमुख उपस्थितीत राज्यस्तरीय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
सध्या शेतकरी चळवळ क्षीण होत चालली आहे. चळवळीतील कार्यकर्त्यांमध्ये मरगळ आली आहे ही मरगळ झटकून टाकून नवी ऊर्जा त्यांच्यामध्ये निर्माण करावी यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शेती पूरक व शेतमालावर आधारित उद्योग- व्यवसायाला चालना देऊन रोजगार निर्मितीसाठी पुढाकार घेणे, युवकांना त्यासाठी प्रेरित करणे याबाबतचे देखील प्रशिक्षण या शिबिरात दिले जाणार आहे. संघटन बांधणी कशी करावी यासाठी संघटन कौशल्यावर प्रकाश टाकला जाणार आहे. कार्यकर्त्यांची वैचारिक बैठक पक्की असावी, त्यांची वैचारिक भूमिका स्पष्ट असले पाहिजे यासाठी विविध क्षेत्रातील तज्ञांचे मार्गदर्शन या शिबिरात होणार आहे. रविकांत तुपकर यांचे प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या या शिबिरात दोन दिवस वैचारिक मंथन, गटचर्चा, प्रश्नोत्तरे, सादरीकरण आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांचे मार्गदर्शन अशा भरगच्च उपक्रमांनी हे राज्यस्तरीय शिबीर पार पडणार आहे.
शिबिराच्या दुसऱ्या दिवशी समारोपीय सत्रामध्ये संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रविकांत तुपकर यांचे मार्गदर्शन होणार आहे. कोयना ऍग्रो टुरिझम तापोळा ता.महाबळेश्वर येथे 8 एप्रिल रोजी सकाळी 9 वाजता या राज्यस्तरीय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराचा प्रारंभ होणार असून 9 एप्रिल रोजी दुपारी 3 वाजता समारोप होणार आहे. याच दरम्यान राज्य कार्यकारिणीची बैठक देखील होणार आहे. या बैठकीत क्रांतिकारी शेतकरी संघटनेतील पुढील दिशा, आंदोलने आणि नवीन पदाधिकारी नियुक्ती बाबत चर्चा करून निर्णय घेतला जाणार आहे. या बैठकीला राज्यभरातील निवडक पदाधिकारी, कार्यकर्ते तथा शेतकरी चळवळीतील काम करणाऱ्या शेतकरी पुत्रांची उपस्थिती राहणार आहे. हे दोन दिवसीय शिबीर वैचारिक मेजवानी ठरणार असून क्रांतिकारीच्या मावळ्यांना नवी ऊर्जा आणि प्रेरणा मिळणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष राजकुमार कसबे व राज्य समन्वयक सचिन पांडुळे यांनी सांगितले आहे.
* तुपकरांच्या भूमिकेकडे लक्ष :
प्रदीर्घ काळानंतर रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात राज्यव्यापी बैठक होत आहे. त्यामुळे आता रविकांत तुपकर नेमकी काय भूमिका घेतात, एखाद्या आक्रमक आंदोलनाची घोषणा करतात की राज्याच्या राजकारणात खळबळ उडून देणारी नवी भूमिका जाहीर करतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहणार आहे. यापूर्वीचा अनुभव पाहता प्रत्येक राज्यस्तरीय बैठकीत तुपकरांनी आंदोलनांचा नवीन बॉम्ब फोडला आहे, आता या बैठकीत ते नेमकी कोणती तोफ डागतात याकडे सगळ्यांच्या नजरा लागून आहेत. त्यामुळे ही बैठक महत्वाची मानली जात आहे.
