बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
भारत रत्न मौलाना अबुल कलाम आझाद रिसर्च सेंटर, औरंगाबाद (संभाजीनगर) येथे आयोजित एका भव्य व प्रतिष्ठित समारंभात महाराष्ट्र राज्य उर्दू साहित्य अकादमीचे अध्यक्ष हुसेन अख्तर, शिक्षक आमदार विक्रम काडे तसेच इतर मान्यवरांच्या हस्ते शेख मतीन शेख नजीर (सहाय्यक शिक्षक, समूह साधन केंद्र, जिल्हा परिषद उर्दू उच्च प्राथमिक मुलांची शाळा, देऊळघाट, पंचायत समिती बुलढाणा) यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
हा पुरस्कार Happy to Help Foundation यांच्या वतीने त्यांच्या उत्कृष्ट शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्याची दखल घेऊन प्रदान करण्यात आला. त्यांच्या नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धती, शाळेतील उपक्रमशील कार्य, तसेच विद्यार्थ्यांप्रती असलेली जिव्हाळ्याची व मार्गदर्शक वृत्ती या गुणांचा विशेष विचार करून त्यांची निवड करण्यात आली.
महाराष्ट्र राज्यातून एकूण 6 शिक्षकांची निवड करण्यात आली असून त्यामध्ये 3 उर्दू माध्यम तर 3 मराठी माध्यम शाळांतील शिक्षकांचा समावेश आहे. शेख मतीन शेख नजीर हे राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त शिक्षक असून, त्यांच्या मनमिळावू स्वभावामुळे, आधुनिक अध्यापन शैलीमुळे आणि विद्यार्थी-केंद्रित उपक्रमांमुळे ते शैक्षणिक क्षेत्रात एक वेगळी ओळख निर्माण करून आहेत. त्यांच्या या यशाबद्दल कुटुंबीय, मित्रपरिवार, शैक्षणिक क्षेत्र तसेच देऊळघाट व बुलढाणा जिल्ह्यात आनंदाची लहर पसरली आहे.
Happy to Help Foundation चे संस्थापक व अध्यक्ष शेख अब्दुल रहीम यांनी यावेळी सांगितले की, शेख मतीन यांसारख्या गुणी, उच्चशिक्षित, तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करणाऱ्या व विद्यार्थी प्रिय शिक्षकाच्या कार्याचा सन्मान करणे आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे.
पुरस्कार जाहीर झाल्यानंतर शेख मतीन यांनी Happy to Help Foundation व सर्व सहकाऱ्यांचे आभार मानत सांगितले की, ही यशस्वीता माझ्या आई-वडिलांचे, गुरुजनांचे, कुटुंबीयांचे, मित्रांचे आणि माझ्या विद्यार्थ्यांच्या आशीर्वाद व प्रार्थनांचे फलित आहे. यापुढेही मी त्याच जिद्दीने व समर्पणाने शैक्षणिक कार्य करत राहीन, असेही त्यांनी सांगितले.
