हनुमान भक्त शंकर शेळकेंनी जपली महाप्रसादाची ४१ वर्षांची परंपरा* आज तीन क्विंटलची महापंगत

हनुमान भक्त शंकर शेळकेंनी जपली महाप्रसादाची ४१ वर्षांची परंपरा
* आज तीन क्विंटलची महापंगत
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
       हनुमान जयंतीनिमित्त देशभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. शहरातील शंकर शेळके हे गेल्या ४१ वर्षांपासून बजरंगबलीची अखंड सेवा करीत असून महाप्रसादाची परंपरा जपत आहेत. 

श्रीराम भक्त महाबली हनुमान यांचे देशभरात भक्त आहेत. संकट मोचन म्हणून हनुमानाकडे बघितले जाते. मनोभावे सेवा करून उपासना केली जाते. यावर्षी २ एप्रिल रोजी हनुमान जयंती साजरी केली जाणार आहे. चैत्र पौर्णिमा तिथी असल्याने जन्मोत्सव साजरा होणार आहे.
प्रभू श्रीरामांचे परमभक्त हनुमान यांचा जन्म चैत्र पौर्णिमेला झाला. त्यांना शक्ती आणि बुद्धीचे दैवत मानले जाते. यादिवशी उपवास, पूजा, हनुमान चालीसा पठण आणि मारुती स्तोत्र म्हणून संकटमोचकाची कृपा मिळवली जाते. हनुमान हे चिरंजीवी मानले जातात, ते बुद्धी, शक्ती आणि आरोग्याचे प्रतीक आहेत. हनुमानाला सिंदूर आणि तेल अर्पण केल्याने सर्व संकटे दूर होतात अशी मान्यता आहे. मूर्तीला शेंदूर लावणे, चोळा अर्पण करणे, आणि लाल फुले अर्पण करण्यात येतात. हनुमान चालीसा, बजरंग बाण, मारुती स्तोत्र आणि सुंदरकांडाचे पठण केले जाते. बजरंगबलीस बुंदी, लाडू किंवा गुळ-चणे यांचा प्रसाद दाखवला जातो. बुलढाणा येथील शेळके परिवारातील सदस्य हनुमानाची भक्ती करतात. संगम चौकातील हनुमान मंदिरात अखंड दिवा लावतात. दररोज पूजाअर्चना करतात. मंदिर परिसराची स्वच्छता ठेवली जाते.


* तीन क्विंटलचा महाप्रसाद : 

         हनुमान जयंतीला दरवर्षी तीन क्विंटलचा महाप्रसाद वाटप करण्यात येतो. जवळपास दोन हजार भाविक याचा लाभ घेतात. वरण, भात, पोळी, भाजी, बुंदीची पंगत ठेवण्यात येते. महाप्रसादाचे यंदाचे ४१ वे वर्षे आहे. शहर आणि परिसरातील भाविक महापंगतीमध्ये महाप्रसादाचा लाभ घेतात, अशी माहिती आयोजकांनी दिली. 


       प्रभू श्रीरामांचे भक्त महाबली हनुमान यांची ४१ वर्षांपासून अखंड सेवा करीत आहोत. त्यांच्या कृपाशीर्वादाने जीवनात सर्वकाही मंगल आहे. ईश्वराने सेवा करण्याची संधी दिली, हे माझे भाग्य समजतो. भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा, ही विनंती. 

* शंकर शेळके, बुलढाणा