* सकल मातंग समाजाचा आरोप ; रायपूर ठाणेदारांना निवेदन
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
रायपूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या माळवंडी येथे १९ मार्च रोजी वामन काशीराम यंगड (५२ वर्ष) यांचा खून झाला होता. गावातील अपप्रवृत्तीच्या लोकांनी जातीयद्वेष भावनेतून, कट कारस्थान करून ही हत्या केली. घटनेनंतर पुरावे देखील नष्ट करण्यात आल्याचा प्रयत्न झाला असून, शवविच्छेदन प्रक्रिया देखील संशयास्पद असल्याचा आरोप सकल मातंग समाजाच्यावतीने करण्यात आला आहे. या संदर्भात रायपूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांच्याकडे २३ मार्च रोजी निवेदन देण्यात आले आहे.
दिलेल्या निवेदनात नमुद आहे की, माळवंडी येथील मातंग समाजातील वामन काशीराम यंगड यांना गावगुंडांनी कटकारस्थान रचून भयंकर मारहाण केली व त्यांचा जातीय द्वेषातून खून केला. खून केल्यानंतर दोषींनी प्रकरणातील पुरावे नष्ट करण्यासाठी मृतकाच्या अंगावरील कपडे बदलण्याचा प्रयत्न केला. इतकेच नाही तर, पीडित परिवारावर प्रचंड दबाव टाकून दोषींना वाचवण्यासाठी मृतकाच्या शवविच्छेदन प्रक्रियेत हलगर्जीपणा करण्यात आल्याचा आरोप निवेदनाद्वारे करण्यात आला आहे. त्यामुळे, आरोपींसह शवविच्छेदन करणारे डॉक्टर यांच्यावर देखील कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या गांभीर्यपूर्ण प्रकरणात तातडीने कार्यवाही होणे गरजेचे आहे. अन्यथा सकल मातंग समाज बांधवांच्या वतीने रायपूर पोलीस स्टेशन समोर ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.
निवेदनावर कैलास भाऊ खंदारे, भगवान गायकवाड, गणेश अंभोरे, मुकेश खरात, ओम प्रकाश नाटेकर, श्याम यंगड, निखिल बोरकर, रामेश्वर वीरशीद यांसह अनेकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
