पुनर्वी काटकरला नवोदय परीक्षेत घवघवीत यश * अभ्यासात सातत्य ठेवल्यास यशस्वी होणे सोपे : पुनर्वी काटकर

पुनर्वी काटकरला नवोदय परीक्षेत घवघवीत यश 
* अभ्यासात सातत्य ठेवल्यास यशस्वी होणे सोपे : पुनर्वी काटकर 
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
        शहरातील प्रसिद्ध वैद्यकीय क्षेत्रातील नाव म्हणून ओळख असलेले डॉ. दिपक काटकर यांच्या कन्या पुनर्वी काटकर हिने नुकत्याच झालेल्या जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत नाव उज्ज्वल केले आहे. तिच्या या यशामुळे सर्वत्र तिचे कौतुक होत असून, शैक्षणिक क्षेत्रातही तिची विशेष दखल घेतली जात आहे.
           पुनर्वीने आपल्या यशामागील प्रवास सांगताना नमूद केले की, सुरुवातीला नवोदयच्या क्लासेसला सुरुवात केल्यानंतर अभ्यास कठीण वाटत होता. काही विषय समजायला वेळ लागत होता आणि परीक्षेबद्दल मनात भीतीही निर्माण झाली होती. मात्र, ही अडचण तिने आपल्या आई-वडिलांना सांगितल्यानंतर त्यांनी तिचे मनोबल वाढवले. तसेच शिक्षकांनीही योग्य मार्गदर्शन करून अभ्यासाची पद्धत समजावून सांगितली. यामुळे तिचा आत्मविश्वास वाढला आणि ती अधिक मेहनतीने अभ्यास करू लागली.
         ती पुढे म्हणाली की, “परीक्षा एवढी कठीण नसते, परंतु तिची भीतीच जास्त असते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी घाबरून न जाता आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जावे.” तिच्या या सकारात्मक दृष्टिकोनामुळेच तिने हे यश मिळवले असल्याचे दिसून येते. पुनर्वीच्या या यशाबद्दल तिच्या आई-कल्पना काटकर, वडिलांनी दिपक काटकर तिचे मनापासून कौतुक केले असून, तिच्या मेहनतीचा आणि चिकाटीचा अभिमान असल्याचे त्यांनी व्यक्त केले. पुनर्वीनेही आपल्या यशाचे संपूर्ण श्रेय आई-वडील आणि गुरुजनांना दिले आहे. पुनर्वी काटकरच्या या उल्लेखनीय यशामुळे विविध स्तरांतून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.