* वरवंड येथील संवाद मेळाव्यातून काँग्रेस प्रवेशाची घोषणा
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
आजोबा दिवंगत उत्तमराव पाटील यांनी १९४२ च्या लढ्यात महात्मा गांधी यांच्यासोबत देशाला स्वातंत्र्य मिळावे यासाठी इंग्रजांविरुद्ध संघर्ष केला. तुरुंगावास सुद्धा भोगला. क्रांतिसिंह नानासाहेब पाटील यांच्या प्रति सरकारमध्येही ते अग्रस्थानी होते. काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष पद त्यांनी १५ वर्षे भुषवले होते. शिव, शाहू, फुले, आंबेडकरी विचारांचा वारसा त्यांनी जपला. तोच वारसा पुढे घेऊन जाण्यासाठी आपण काँग्रेस पक्षात प्रवेश घेणार आहोत. काँग्रेसमध्ये संधी मिळाल्यास संधीचे सोने करु, असा विश्वास राजर्षी शाहू परिवाराचे अध्यक्ष तथा वन बुलढाणा मिशनचे संकल्पक संदीप शेळके यांनी व्यक्त केला.
शिवसेना उबाठा पक्षाचा पाच मार्च रोजी राजीनामा दिल्यानंतर संदीप शेळके यांनी ७ मार्च रोजी वरवंड येथे जिवाभावाच्या सहकाऱ्यांसोबत संवाद साधला. तसेच आपली पुढील राजकीय भूमिका स्पष्ट केली. यावेळी बोलतांना ते म्हणाले, जिल्ह्यातील अनेकजण माझ्याविषयी मत व्यक्त करताना, सहकार क्षेत्रात असून पैशाच्या जोरावर राजकारण करत असल्याचा आरोप करतात. केवळ विरोधाचे राजकारण करण्याचा त्यांचा हेतू आहे. राजर्षी शाहू परिवाराच्या माध्यमातून गेली २४ वर्षे आपण समाजकारण, सहकार, राजकारणात सक्रिय आहोत. राजर्षी शाहू परिवार आणि वन बुलढाणा मिशनच्यावतीने आयोजित रक्तदानाचा महायज्ञ अंतर्गत योगदानाची दखल इंडिया बुक ऑफ रेकॉर्डने घेतली आहे. हजारो युवकांना व्यवसाय प्रशिक्षण देऊन प्रत्यक्ष रोजगार उपलब्ध केला आहे. बचतगटांच्या महिलांना आर्थिक सहाय्य उपलब्ध करुन आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचे काम करीत असून त्याचे आत्मिक समाधान आहे. राजकारणात काम करतांना शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आक्रोश मोर्चा, मेळावे, युवक, महिला, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक यासह विविध घटकांसाठी आंदोलने केल्याचे त्यांनी सांगितले. संवाद मेळाव्याला संजय बाहेकर, सुनील राजपूत, इरफान पठाण, शाम सावळे, पृथ्वी राजपूत, देवा पाटील, वासुदेव वायझोडे, शरद पाटील, वसंता इंगळे, शिवाजी राजे, मुरलीधर इंगळे, संतोष म्हस्के यांच्यासह जिल्ह्यातील जिवाभावाचे सहकारी उपस्थित होते.
* प्रवाहाविरुद्ध लढण्याचा आपला स्वभाव :
प्रवाहासोबत सगळेच जात असतात; परंतु प्रवाहाविरुद्ध लढण्याचा आपला स्वभाव आहे. आपण सर्वांनी माझ्या सुख- दुःखात मोलाची साथ दिली. यापुढेही आपण माझ्यासोबत असाल, अशी अपेक्षा व्यक्त करीत काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याचे संदीप शेळके यांनी जाहीर केले. तळागाळातील सर्व घटकांना सोबत घेऊन न्याय देण्यासाठी आपण प्रयत्न करू. जिल्ह्याच्या विकासासाठी आपल्या माध्यमातून सातत्याने पाठपुरावा करत राहू, असे त्यांनी सांगितले.
