शासकीय योजनांची माहिती आता एकाच छताखाली; शेगावमधील मल्टीमीडिया प्रदर्शनाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

शासकीय योजनांची माहिती आता एकाच छताखाली; शेगावमधील मल्टीमीडिया प्रदर्शनाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
​बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
       नागरिकांना सामाजिक न्याय विभागाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती आधुनिक स्वरूपात मिळावी, यासाठी जिल्हा माहिती कार्यालयाने आयोजित केलेल्या मल्टीमीडिया प्रदर्शनाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. शेगाव येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी नगर भवनात सुरू असलेल्या या उपक्रमाचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.

          माहिती एका क्लिकवर ​जिल्हा वार्षिक अनुसूचित जाती उपयोजनेअंतर्गत, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग आणि जिल्हा माहिती कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने हे प्रदर्शन भरवण्यात आले आहे. एकाच ठिकाणी सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांची चित्रमय माहिती प्रदर्शित करण्यात आली आहे. यामध्ये योजनेचे स्वरूप, लाभाचे स्वरूप, लाभार्थी पात्रता, अर्ज कुठे करावा, संपर्क कुठे साधावा आदी माहिती प्रत्येक पॅनलवर सविस्तर मांडण्यात आली आहे.

        सदर मल्टीमीडिया प्रदर्शनीला शहरी व ग्रामीण भागातील नागरिकांनी भेट देऊन शासनाच्या योजनांची माहिती जाणून घ्यावी तसेच संबंधित विभागाकडे अर्ज सादर करून योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

       जिल्ह्यातील नागरिकांना मल्टीमीडियाच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजनांची माहिती व्हावी या उद्देशाने ही प्रदर्शनी 30 मार्चपर्यंत आयोजित करण्यात आली आहे. सदर प्रदर्शनी सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत सर्वांसाठी खुली आहे. तरी जिल्ह्यातील नागरिकांनी या प्रदर्शनीला अवश्य भेट द्यावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.