काँग्रेसच्या भरवशावर जिंकले अन काँग्रेसलाच बाजूला केले..* सगळं त्यांनाच द्यायचे मग आपण काय करायचे..? * नगराध्यक्ष पदाचे उमेदवार कासम गवळी यांचा उबाठाला उद्देशून सवाल

काँग्रेसच्या भरवशावर जिंकले अन काँग्रेसलाच बाजूला केले..
* सगळं त्यांनाच द्यायचे मग आपण काय करायचे..? 
* नगराध्यक्ष पदाचे उमेदवार कासम गवळी यांचा उबाठाला उद्देशून सवाल
मेहकर : (एशिया मंच न्यूज )
       विधानसभेत काँग्रेसच्या भरवशावर जे विजयी झाले त्यांनी काँग्रेसला बाजूला केले. तरीही त्यांनाच द्यायचं मग काँग्रेसने काय करायचे.? असा सवाल करीत नगराध्यक्ष पदाचे उमेदवार कासमभाई गवळी यांनी उबाठावर जोरदार टीकास्त्र सोडले. काँग्रेस हा विचार असून कधीच संपणार नाही. जनता जनार्दन आजही काँग्रेससोबत असल्याचा विश्वास त्यांनी बोलून दाखवला. 

         काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची आज २३ नोव्हेंबर रोजी स्थानिक फँक्शन हॉल येथे बैठक संपन्न झाली. यावेळी ते बोलत होते. पक्षनेते श्यामभाऊ उमाळकर, लक्ष्मणदादा घुमरे, नंदूभाऊ बोरे, देवानंदभाऊ पवार, ॲड.अनंतराव वानखेडे यांच्यासह काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. पुढे बोलतांना कासमभाई म्हणाले, मेहकर शहरात व तालुक्यात काँग्रेस जिवंत ठेवण्यासाठी सर्वांनी जिद्दीने कामे करा. भविष्यात काँग्रेसला नक्कीच चांगले दिवस येणार आहेत. यापुढे आपल्याला लोकांच्या मागे फिरायचे नाही. काँग्रेसने ज्यांना फोकसमध्ये आणले त्यांनी आज काँग्रेसलाच बाजूला सारण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे. मेहकरचे जनता त्यांना जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. उपस्थित मान्यवरांनीही यावेळी मार्गदर्शन केले.