खासगी रुग्णालयांकडून रुग्णांच्या लूटीला लगाम लावा अन्यथा तोड-फोड आंदोलन करु * वंचित बहुजन आघाडीच्या वतीने इशारा

खासगी रुग्णालयांकडून रुग्णांच्या लूटीला लगाम लावा अन्यथा तोड-फोड आंदोलन करु 
* वंचित बहुजन आघाडीच्या वतीने इशारा
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
     शहरातील खाजगी रुग्णालयात अवाजवी देयके काढून सामान्य रुग्णाची होणारी लूट व रुग्णालय प्रशासनाचा मनमानी कारभार बंद करावा, अशी मागणी 30 सप्टेंबर रोजी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बिराजदार यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

दिलेल्या निवेदनात नमूद आहे की, उपचाराच्या सुविधा व दर्जा बघता बुलढाणा शहरातील रुग्णालयामध्ये जिल्ह्याभरातून रुग्ण उपचारासाठी येतात. परंतु रुग्णाची आणि त्यांच्या नातेवाईकांची कमजोरी लक्षात घेऊन डॉक्टर्स त्यांच्याकडून अवाजवी देयके वसूल करतात. आपला रुग्ण बरा व्हावा म्हणून नातेवाईक सुद्धा उसनवारी अथवा व्याजाने पैसे काढून कासावीस झालेले असतात. संबंधित डॉक्टर आवश्यकता नसतांना रुग्णाच्या अनावश्यक चाचण्या करुन त्यांना आयसीयूमध्ये रेफर करतात आणि अठराविक रक्कमची बिले काढून त्या रुग्णाची एक प्रकारे लूट करतात. रुग्ण उपचारादरम्यान दगावल्यास संपूर्ण बिले अदा केल्याशिवाय रुग्णाचे प्रेत नातेवाईकांच्या ताब्यात मिळत नाही. हा प्रकार शहरातील जास्तीत जास्त खाजगी रुग्णालयांमध्ये सर्रासपणे सुरू आहे.

         खाजगी रुग्णालयात चार्जेस फलक लावून रुग्ण अथवा नातेवाईकांना अवलोकन करण्यात यावे. रुग्णालयातील सीसीटीव्ही कार्यान्वित करून रुग्णाच्या अंतिम उपचारानंतर नातेवाईकांनी सीसीटीव्ही फुटेजची मागणी केल्यास विनामूल्य देण्यात यावे. डॉक्टरांच्याच मालकीचे अथवा नातेवाईक यांच्या नावावर असलेल्या मेडिकल स्टोअरच्या माध्यमातून रुग्णाची होणारे लूट थांबवावी. खाजगी डॉक्टरांनी रुग्णांना जास्तीत जास्त जेनेरिक औषधी आपल्या प्रिस्कीपशन वर लिहून देण्यात यावी. डॉक्टर आणि रुग्णालयीन कर्मचाऱ्यांची अरेरावी रोखण्यासाठी कारवाई करावी, आदी मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत. 30 दिवसाच्या आत मागण्यांवर तोडगा न काढल्यास वंचित बहुजन आघाडीच्या वतीने बुलढाणा शहरातील खाजगी दवाखाने तोड-फोड आंदोलन करणार असल्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव प्रशांत वाघोदे आदींसह पदाधिकारी कार्यकर्त्यांनी दिला आहे.