* मुख्यमंत्री यांच्याकडे विविध मागण्याचे निवेदन
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
नाशिकच्या त्र्यंबकेश्वर येथे वृत्त संकलनासाठी गेलेले वृत्तवाहिनीचे पत्रकार किरण ताजणे, योगेश खरे व अभिजीत सोनवणे यांना प्रवेश टोल पॉइंटवर अमानुष मारहाण करण्यात आल्याची घटना गत शुक्रवारी समोर आली. या घटनेच्या निषेधार्थ, मराठी पत्रकार परिषद सलग्नित जिल्हा पत्रकार संघ, डिजिटल मीडिया परिषद तसेच इलेक्ट्रॉनिक मीडिया असोसिएशनच्यावतीने सोमवार २२ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांना निवेदन देण्यात आले.
लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकारितेला मान्यता आहे. पत्रकार समाजाचे प्रश्न जनतेपर्यंत पोहोचवतात; त्यांच्यावरील हल्ले हे थेट लोकशाहीवरील हल्ले आहेत. नाशिक त्र्यंबकेश्वर या ठिकाणी तीन ते चार पत्रकारांना प्रवेश टोल पॉईंटवर अमानुष करण्यात आली. याचे व्हिडिओ सोशल मीडियावर अनेकांनी पाहिले आहेत. राज्यभरातील पत्रकारांकडून या घटनेचा निषेध व्यक्त केला जात आहे. सदर प्रकरणात पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. परंतु टोल वसुली करणाऱ्या ए.एस. मल्टी सर्विसेसच्या मालकाविरोधात गुन्हा दाखल करणे गरजेचे असून, सदर कंपनीला ब्लॅक लिस्टमध्ये टाकून राज्यभरात कुठेही, कुठलाही ठेका दिला जाऊ नये, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनदेतेवेळी जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष रणजीतसिंग राजपूत, इलेक्ट्रॉनिक मीडिया असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष फहीम देशमुख, डिजिटल मीडिया परिषदेचे विभागीय सचिव जितेंद्र कायस्थ, जिल्हाध्यक्ष गणेश सोळंकी, पत्रकार सर्वश्री राजेश डीडोळकर, युवराज वाघ, वसीम शेख, विजय देशमुख, कासिम शेख, दीपक मोरे, डॉ. भागवत वसे, सुनील मोरे, अजय राजगुरे, ब्रह्मानंद जाधव, पृथ्वीराज चव्हाण, निनाजी भगत, रहेमत अली, विनोद सावळे,शौकत शाह, संदीप शुक्ला, संदीप वानखेडे, प्रफुल खंडारे, अभिषेक वरपे
यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.
* पत्रकार हल्ला विरोधी जिल्हास्तरीय समिती स्थापित व्हावी : रणजीत राजपूत
गृहमंत्र्यालयाने पत्रकार संरक्षण कायदा प्रकरणांची समीक्षा करण्यासाठी समिती गठीत करावी, प्रलंबित प्रकरणांची चौकशी करावी याशिवाय जिल्हास्तरावर पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली गठित होणे गरजेचे आहे. यात, पोलीस अधीक्षक सचिव म्हणून तर वकील संघाचे अध्यक्ष तसेच काही सामाजिक कार्यकर्ता हे सदस्य म्हणून असावे. विशेष भाग म्हणजे, राजकीय व्यक्ती यामध्ये नसावे, राजकारण विरहित ही समिती व्हावी, अशी प्रमुख मागणी पत्रकार संघाचे अध्यक्ष रणजीतसिंग राजपूत यांनी केली.
* पत्रकारांना शस्त्र परवाना द्या : फहीम देशमुख
पत्रकारांवर हल्ले होणे, या घटना नवीन नाहीत. समाजाचे प्रश्न समोर मांडत असताना, पत्रकारांना अनेक बिकट परिस्थितींना सामोरे जावे लागते. पत्रकारांवरील हल्ले रोखण्यासाठी प्रशासनाने त्यांना शस्त्र परवाना द्यावा, अशी मागणी टीव्ही जर्नलिस्ट, डिजिटल मीडिया असोसिएशनचे फहीम देशमुख यांनी केली.