बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लढा उभा करणाऱ्या क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या आंदोलनाला यश आले आहे. राज्य सरकारने शासकीय ज्वारी खरेदीला ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिल्याचे १८ सप्टेंबर रोजी जारी केलेल्या परिपत्रकाद्वारे स्पष्ट झाले आहे.
३० ऑगस्ट रोजी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली हजारो शेतकऱ्यांनी मलकापूर येथील उपविभागीय कार्यालयावर भव्य मोर्चा काढला होता. या मोर्च्यात ज्वारी खरेदी केंद्र तात्काळ सुरू करावे व मुदतवाढ द्यावी, यासह विविध मागण्या मांडण्यात आल्या होत्या.
बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव, खामगाव, संग्रामपूर, जळगाव जामोद व मलकापूर या भागात यंदा ज्वारीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात झाले आहे. शेतकऱ्यांनी हमीभावासाठी नोंदणी केली असली तरी खरेदी केंद्र बंद असल्याने त्यांना ज्वारी कमी दराने खुल्या बाजारात विकावी लागत होती. त्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडले होते.
क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे व मोर्चामुळेच प्रशासन व सरकारवर दबाव निर्माण झाला आणि अखेर शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
या मुदतवाढीबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना शेतकरी नेते रविकांत तुपकर म्हणाले, शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढा देणे हेच आमचे ध्येय आहे. शासकीय ज्वारी खरेदी केंद्र सुरू ठेवण्यासाठी आम्ही संघर्ष केला आणि शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. पुढेही शेतकऱ्यांसाठी लढत राहू.
शासकीय ज्वारी खरेदीस ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ संघटनेच्या वतीने दिलेल्या लढ्यामुळे मिळाल्याचा दावा क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या कार्यालयाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला आहे.