* क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे पालकमंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
सततच्या व अवकाळी पावसामुळे बुलडाणा जिल्ह्यातील शेतजमिनीतील उभ्या पिकांचे अतोनात नुकसान झाले असून शेतकरी पूर्णपणे आर्थिक संकटात सापडला आहे. कापूस, सोयाबीन, मूग, उडीद यांसह सर्व हंगामी पिकांचे कंबरडे मोडले आहे. या गंभीर परिस्थितीत शासनाने तातडीने बुलडाणा जिल्ह्यास ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने पालकमंत्री यांच्याकडे आज 26 सप्टेंबर रोजी निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
दिलेल्या निवेदनात नमूद आहे की, बुलढाणा जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसाने प्रचंड हाहाकार माजवला असून, अनेक गावांतील शेती आणि पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांना दुबार पेरणी करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे सरकारने तातडीने मदत करणे गरजेचे आहे. सरकारने तातडीने मदत करणे गरजेचे आहे. अनेक ठिकाणी शेतजमिनी पूर्णपणे खरडून गेल्या असून शेतांमध्ये पाणी साचून तलावाचे स्वरूप निर्माण झाले आहे. शेतकऱ्यांची अवस्था गंभीर असून कर्जबाजारीपणामुळे आत्महत्येची वेळ निर्माण झाली आहे.
संघटनेने आज पालकमंत्री बुलडाणा जिल्हा तसेच मदत व पुनर्वसन मंत्री, महाराष्ट्र राज्य यांना निवेदन सादर करीत पुढील मागण्या केल्या आहेत. यामध्ये बुलडाणा जिल्ह्यास ओला दुष्काळ घोषित करावा, शेतकऱ्यांना एकरी किमान रु. ५०,०००/- थेट आर्थिक मदत तातडीने वितरित करण्यात यावी, सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी तात्काळ करण्यात यावी, अश्या आहेत. शेतकरी हा अन्नदाता असून त्याचे जीवनमरणाचा प्रश्न निर्माण झालेला आहे. शासनाने सकारात्मक व तातडीने निर्णय न घेतल्यास शेतकऱ्यांना तीव्र आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल. शेतकऱ्यांच्या बाजूने हा लढा शेवटपर्यंत लढविण्याचा निर्धार क्रांतिकारी चे अमोल मोरे यांनी व्यक्त केला आहे.
यावेळी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे अमोल मोरे, दत्तात्रय जेऊघाले ,राहुल शेलार, महेंद्र जाधव, शत्रुघ्न तुपकर, हर्षल गवते आदी कार्यकर्ते उपस्थित होते.