* महाराष्ट्र राज्य तहसीलदार संघटनेचा राज्यभर काम बंदचा इशारा!
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
निरोप समारंभाच्या कार्यक्रमात गाणे गायल्याने निलंबित करण्यात आलेले तहसीलदार प्रशांत थोरात रेनापुर , जिल्हा लातूर यांचे अन्यायकारक निलंबन ताबडतोब मागे घेण्यात यावे. या मुख्य मागणीसाठी महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेने राज्यभर काम बंद आंदोलनाचा इशारा दिला आहे. 20 ऑगस्ट रोजी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार विजय पाटील यांचा नेतृत्वात जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर केले.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, तहसीलदार प्रशांत थोरात यांची बदली उमरी जिल्हा नांदेड येथून रेणापूर जिल्हा लातूर येथे झाली होती. त्या निमित्ताने 8 ऑगस्ट रोजी निरोप समारंभाचा कार्यक्रम आयोजित होता. कार्यक्रमादरम्यान त्यांनी गाणे गायल्याने त्यांच्यावर दोषारोप ठेवून निलंबनाची कारवाई करण्यात आली. सदर कारवाई अत्यंत अन्यायकारक असल्याने प्रशांत थोरात यांचे निलंबन मागे घेण्यात यावे, नायब तहसीलदारांची ग्रेड पे जुनी मागणी मंजूर करण्यात यावी, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कायद्यानुसार कार्यकारी दंडाधिकारी यांचे अधिकार मर्यादित करण्यात आले, त्यांना पूर्व अधिकार देण्यात यावे, महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 चे कलम 155 अंतर्गत लेखन प्रमाण दुरुस्ती अधिकार याची व्याप्ती वाढवावी यासह विविध मागण्यांचे निवेदन महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय पाटील यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले. यावेळी डॉक्टर रामेश्वर पुरी sdo खामगाव, शैलेश काळे जळगाव जामोद, शरद पाटील बुलढाणा, रवींद्र जोगी मेहकर, संतोष शिंदे मलकापूर, संजय खडसे सिंदखेड राजा हे उपविभागीय अधिकारी, सर्व तहसीलदार ,नायब तहसीलदार यांची उपस्थिती होती. मागण्या मान्य न झाल्यास राज्यभर काम बंदचा इशारा संघटने द्वारा देण्यात आला आहे.