* संघटना लवकरच आंदोलनाची पुढील दिशा ठरविणार !
चिखली : (एशिया मंच न्यूज )
सिटू संलग्न लाल बावटा शालेय पोषण आहार कामगार संघटनेचे दुसरे जिल्हा अधिवेशन रविवार 3 ऑगस्ट रोजी चिखली येथे मौनी बाबाच्या मठाच्या सभागृहात संघटनेचे जिल्हा अध्यक्ष कॉम्रेड पंजाबराव गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात संपन्न झाले. अधिवेशनाचे उद्घाटन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य उपाध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर संतोष आंबेकर यांनी केले तर या अधिवेशनाला शालेय पोषण आहार कामगार फेडरेशनचे राज्य महासचिव कॉम्रेड डॉक्टर अशोक थोरात हे मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. यावेळी बोलताना कॉम्रेड थोरात यांनी शालेय पोषण आहार कामगारांच्या मानधन वाढीबाबत सरकार प्रचंड उदासीन आहे. निवडणुकीपूर्वी तत्कालीन मंत्रिमंडळाच्या कॅबिनेट बैठकीत घेतलेला एक हजार रुपये मानधन वाढीचा निर्णय नव्याने तेच सरकार सत्तेवर आल्यावर त्याला विसर पडलेला आहे. संघटनेने अनेकदा याबाबत आंदोलन करून सुद्धा सरकार चाल ढकल करीत आहे. सरकारने तातडीने आपण घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करावी. अन्यथा सीटूच्या नेतृत्वात राज्यभर लवकरच एक मोठे आंदोलन सरकारच्या उदासीन धोरणा विरोधात पुकारण्यात येईल, असा इशारा यावेळी कॉ. थोरात यांनी सरकारला दिला.
या अधिवेशनाच्या प्रसंगी इंटक कामगार संघटनेचे राज्य उपाध्यक्ष तथा नव्याने काँग्रेस पक्षाच्या राज्य उपाध्यक्षपदी निवड झाल्या बद्दल लक्ष्मणराव घुमरे यांचाही याप्रसंगी संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांनी अधिवेशनाला शुभेच्छा दिल्या.
अधिवेशनाच्या दुसऱ्या सत्रात संघटनेचे जिल्हा अध्यक्ष कॉ.पंजाबराव गायकवाड यांनी गेल्या तीन वर्षाचा संघटनेचा संघटनात्मक व आंदोलनात्मक कार्याचे अहवाल वाचन केले. अहवालावर प्रतिनिधीनी चर्चा करून अहवालास मान्यता दिली. अधिवेशनामध्ये पुढील तीन वर्षासाठी जिल्हा कमिटी निवडण्यात आली. यामध्ये अध्यक्ष कॉमेंट पंजाबराव गायकवाड, उपाध्यक्ष शोभा काळे, सचिव समाधान राठोड, कोषाध्यक्ष ज्ञानेश्वर वाघमारे, इत्यादी प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या सह 25 सदस्यांची जिल्हा कार्यकारणी सर्वांनुमते निवडण्यात आली.
अधिवेशन यशस्वी करण्यासाठी ज्ञानेश्वर वाघमारे, समाधान राठोड, रेखा जाधव, अनिल राठोड, उषा डुकरे ज्योती आराख, राजू गिरी ,सुधाकर डुकरे, अनंता धर्माळ, संभाजी डगवाल, संजय सपकाळ,राजेश गायकवाड, गजानन शेळके, मालता खरात, सुनील थुट्टे, शैलेंद्र उप्पलवार, इत्यादी अनेकांनी अथक परिश्रम घेतले.