वनजमिनीवरील अतिक्रमण धारकांवर बोराखेडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा तर वनविभागांतर्गत वनगुन्हा दाखल* अतिक्रमणधारकांवरील कार्यवाही नियमानुसारच- उपवनसंरक्षक सरोज गवस यांची माहिती

वनजमिनीवरील अतिक्रमण धारकांवर बोराखेडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा तर वनविभागांतर्गत वनगुन्हा दाखल
* अतिक्रमणधारकांवरील कार्यवाही नियमानुसारच- उपवनसंरक्षक सरोज गवस यांची माहिती
 
बुलडाणा (जिमाका): (एशिया मंच न्यूज )
        मोताळा तालुक्यातील माळेगावमधील वनजमिनीवरील अतिक्रमणधारकांवर बोराखेडी पोलीस स्टेशनमध्ये फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच वनविभागांतर्गंत सुध्दा वनगुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कार्यवाही नियमानुसार व कायद्याचे पालन करुन करण्यात आली आहे, अशी माहिती उपवनसंरक्षक सरोज गवस यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
 
        23 जुलै 2025 रोजी मोताळा वनपरिक्षेत्रांतर्गत मौजे मोहेगाव, राजुर वनपरिमंडळ, पूर्व खैरखेड बिटअंतर्गत वनखंड क्र. 323 मध्ये अवैधरित्या केलेल्या झोपड्यांवर निष्कासनाची कारवाई करण्यासाठी वनविभागाचे अधिकारी कर्मचारी, पोलीस अधिकारी कर्मचारी व महसूल अधिकारी, राज्य राखीव पोलीस तुकडी यांचेसह गेल्यावर झोपड्या व पाल काढत असतांना अचानकपणे 100 ते 150 लोकांच्या समुहाने येऊन कर्मचा-यावर दगडफेक, डोळ्यात मिरची पावडर फेकली व काठ्या, कोयता, कुऱ्हाडी याने प्राणघातक हल्ला केला होता. हा हल्ला केल्यावर त्या ठिकाणावरुन कर्मचारी वाहनात बसून बाहेर येत असतांना त्या वाहनांना घेरुन वाहनांवर हल्ला केला होता. यामध्ये वाहनांवर दगडफेक केल्याने वाहनांच्या काचा फुटल्या व त्यातील कर्मचारी गंभीर जखमी झाले होते. अतिक्रमण निष्कासित करण्यासाठी आणलेल्या जेसीबीची तोडफोड केली होती. सहाय्यक वनसंरक्षक (रोहयो व वन्यजीव) मेहकर यांचे बोलेरो वाहनाची संपुर्ण तोडफोड करुन जाळुन देण्याचा प्रयत्न केला व इतर वाहने सुध्दा फोडण्यात आले. या हल्ल्यामध्ये वनविभागाचे 5 कर्मचारी (दोन महिला व तीन (पुरुष), पोलीस विभागाचे 8 कर्मचारी (6 महिला व 2 पुरुष) व राज्य राखीव पोलीस दल तुकडी मधील 1 जवान (पुरुष) हे गंभीररित्या जखमी झाले असुन या कर्मचाऱ्यांना तात्काळ जिल्हा रुग्णालय, बुलढाणा येथे उपचाराकरिता दाखल करण्यात आले.
या वनजमीनीवरील अतिक्रमणधारकांनी शेतीसाठी वनहक्क दावे दाखल केले होते. तथापि, घरासाठी दावे दाखल नव्हते. या शेतीच्या दाव्याबाबतचे जिल्हा वनहक्क समितीने सन 2022 मध्ये वनहक्क दावे नामंजूर करण्यात आले होते. यानंतर दावेधारकांनी या दाव्यावर पुनर्विलोकन अर्ज केला व पुरावे सादर करण्यासाठी वेळ मागितला होता. यानुसार दाव्यावर जिल्हा वनहक्क समिती मार्फत पुनर्विलोकन करण्यात आले व यामध्ये सन 2024 मध्ये सदर दावे पुन्हा नामंजूर करण्यात आले. यानंतर वन विभागामार्फत अतिक्रमण काढण्यासाठी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 53, 54 अन्वये कार्यवाही करण्यात आली. यानुसार सहाय्यक वनसंरक्षक (प्रा व कॅम्पा) बुलढाणा यांनी माहे जानेवारी 2025 ते फेब्रुवारी-2025 कालावधीमध्ये अतिक्रमणधारकांना जमिनीवरचे सर्व पुरावेसह कार्यालयात उपस्थित राहण्याबाबत पत्राने कळविले होते. यानुसार या कालावधीत वनपरिक्षेत्र अधिकारी (प्रा) मोताळा व गैरअर्जदार अतिक्रमणधारक यांच्यात सुनावणी घेण्यात आली. अतिक्रमणधारकांचे म्हणणे ऐकूण घेण्यात आले. त्यांचे लेखी म्हणणे सादर केलेले पुरावे यांचा विचार करून सहाय्यक वनसंरक्षक यांनी सदर क्षेत्राबाबत अतिक्रमण निष्कसनाचे आदेश जारी करण्यात आले. अतिक्रमण निष्कासनाची कार्यवाही करण्याअगोदर सदर क्षेत्र खाली/रिकामे करण्याबाबत व निघून जाण्याबाबत 15 दिवस अगोदर संबंधित अतिक्रमणधारकांना वैयक्तिकरित्या नोटीसद्वारे कळविण्यात आले होते.
       तसेच 30 एप्रिल 2025 रोजी स्थानिक वृत्तपत्रातूनही सुचित करण्यात आले होते. यानंतर दिनांक 9 मे ते 19 मे 2025 या कालावधीत अतिक्रमण निष्कसनाची कायदेशीर कार्यवाही करुन राजुर वर्तुळ मधील मौजे खैरखेड, तरोडा, मोहेगाव, कोथळी, काजमपुर येथील वनजमिनीवरील एकूण 400.087 हेक्टर क्षेत्र हटविण्यात आले. यामध्ये माळेगाव मधील सर्व झोपड्या निष्काशीत करण्यात आल्या व त्या ठिकाणी जल मृदा संधारणासाठी जलशोषक चर घेण्यात आले. या क्षेत्रावर वनविभागामार्फत वृक्ष लागवड प्रस्तावित करण्यात आली. यानंतर दि.30 जून 2025 रोजी अतिक्रमणधारक एका दिवसात ट्रॅक्टर टेम्पोने सामान घेऊन आले. अवैधपणे वन क्षेत्रावरील जल मृदा संधारणाची कामे बुजवून व अवैध वृक्षतोड करुन नव्याने घरे व झोपड्या बांधल्या. याबाबत दि. 11 जुलै 2025 रोजी वनपरिक्षेत्र अधिकारी व कर्मचारी यांनी अतिक्रमणधारकांना वनक्षेत्रावरुन निघुन जाण्यास सांगितले असता त्यांनी नकार दिला. त्यानंतर झालेल्या या घटनेच्या अनुषंगाने मोताळा तालुक्यातील माळेगावमधील वनजमिनीवरील अतिक्रमणधारकांवर बोराखेडी पोलीस स्टेशन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच वनविभागांतर्गंत सुध्दा वनगुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कार्यवाही नियमानुसार व कायद्याचे पालन करुन करण्यात आली असल्याची माहिती उपवनसंरक्षक सरोज गवस यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात सांगितले आहे.