पत्रकार सज्जाद हुसेन यांच्यावर हल्ला करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा* बुलढाण्यात असोसिएशन ऑफ स्मॉल अँड मिडीयम न्यूजपेपर्स ऑफ इंडिया संघटनेचे पोलीस अधीक्षकांना निवेदन



पत्रकार सज्जाद हुसेन यांच्यावर हल्ला करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा
* बुलढाण्यात असोसिएशन ऑफ स्मॉल अँड मिडीयम न्यूजपेपर्स ऑफ इंडिया संघटनेचे पोलीस अधीक्षकांना निवेदन
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
      अकोला येथील पत्रकार सज्जाद हुसेन आणि त्यांच्या कुटुंबावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा आज 5 ऑगस्ट रोजी बुलढाणा येथे निषेध नोंदवत असोसिएशन ऑफ स्मॉल अँड मिडीयम न्यूजपेपर्स ऑफ इंडिया संघटनेने पोलीस अधीक्षकांना निवेदन दिले. हल्ला करणाऱ्या आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.


   दिलेल्या निवेदनात नमूद आहे की,   दिनांक २९ जुलै २०२५ रोजी पोलीस अधीक्षक कार्यालय, अकोला येथील जनसंपर्क अधिकाऱ्यामार्फत प्रसारमाध्यमांना एक प्रेस नोट जारी करण्यात आली होती. यामध्ये आपण राबवत असलेल्या विशेष "ऑपरेशन प्रहार" मोहिमेंतर्गत करण्यात आलेल्या कारवाईची बातमी स्वरूपात प्रसिद्ध करण्याची विनंती होती. त्याच अनुषंगाने दैनिक सुफ्फा या वर्तमानपत्राने पोलीस प्रशासनाच्या कारवाईचे कौतुक करत ही बातमी प्रसारित केली होती.

     या बातमीत अकोला येथील इराणी झोपडपट्टीचा रहिवासी गुलाम अली औलाद हुसेन (वय ३५) आणि आकोट फाईलचा रहिवासी अंबादास उर्फ सोनू रोहीदास थोरात (वय २५) यांना उपविभागीय अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार अकोला व बालापूर तालुक्यांतून सहा महिन्यांसाठी तडीपार करण्यात आले असल्याचा उल्लेख होता.

       मात्र, सदर बातमी प्रसिद्ध केल्याच्या निषेधार्थ संबंधित आरोपीने दैनिक सुफ्फा कार्यालयात येऊन मुख्य संपादक सज्जाद हुसेन व त्यांच्या सहकाऱ्यांना जिवे मारण्याची धमकी देत वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पोलिसांकडे याबाबत तक्रार दाखल करण्यात आली होती, आणि पोलिसांनी आरोपीस ताब्यात घेत कारवाई होईल असे सांगितले होते. पण दुर्दैवाने, या घटनेनंतरही संबंधित आरोपीने आपल्या अन्य साथीदारांसह पुन्हा एकदा सज्जाद हुसेन, त्यांच्या कुटुंबीय व कार्यालयातील कर्मचाऱ्यांवर जीवघेणा हल्ला केला. या घटनेत चार व्यक्ती गंभीर जखमी झाल्या आहेत.

       या पार्श्वभूमीवर खालील प्रश्न उपस्थित होतात की, पोलिसांच्या अधिकृत प्रेस नोटवर आधारित बातमी प्रसिद्ध केल्यामुळे जर पत्रकारांना अशा प्रकारे धमकावले व हल्ला केला जात असेल, तर याचे उत्तरदायित्व कोणाचे? आधीच तक्रार नोंदवलेले असूनही आरोपीविरुद्ध ठोस व कठोर कारवाई का झाली नाही? जर ही परिस्थिती अशीच राहिली, तर शहरातील इतर पत्रकारांची सुरक्षितता कोण सुनिश्चित करणार? दरम्यान या भ्याड हल्ल्याचा आज बुलढाना येथील पत्रकार संघटनानी तीव्र निषेध नोंदवला.  गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांविरुद्ध कठोर, कायदेशीर कारवाई करण्यात यावी, तसेच सर्व पत्रकारांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना तत्काळ राबवण्यात याव्यात, अशी  मागणी पोलीस अधीक्षक यांच्याकडे करण्यात आली. यावेळी राज्य सचिव प्रा. सुभाष लहाने, भानुदास लकडे, जिल्हाध्यक्ष शौकत शहा, अशपाक कुरेशी, शेख नदीम, शेख आसिफ, सोहम घाडगे, शेख ईद्रीस, रहेमत अली यांच्यासह पत्रकार बांधव उपस्थित होते.